शेतात दुबार पेरणी करून बियाण्यांची उगवण झाली नाही, तसेच आता पिकाची अपेक्षा नसल्याने आधीच कर्जबाजारी झाल्याच्या विवंचनेतून जिल्हय़ात दोन शेतकऱ्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. अंकुश चांदू चव्हाण (चिखलागर तांडा, तालुका सेनगाव) व शेषराव चंद्रवंशी (सुकळी, तालुका कळमनुरी) अशी या दोघांची नावे आहेत.
अंकुश चव्हाण (वय ५०) हे दुबार पेरणी करून बियाणे उगवले नसल्याने चिंतेत होते. त्यात मुलीचे लग्न कसे करावे, या विवंचनेत सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास शेतात विषारी औषध घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपविली. त्यांच्याकडे साडेतीन एकर जमीन असून दोन मुलगे व तीन मुली आहेत. दोन मुलींचे लग्न झाले आहे. या वर्षी तिसऱ्या मुलीच्या लग्नाचा बेत असताना नापिकी, तसेच कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केली. सेनगाव पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
सुकळी (वळण) येथील शेषराव चंद्रवंशी (वय ६५) यांच्याकडे सहा एकर जमीन असून, तीन वेळा पेरणी करून बियाणे उगवले नाही व कमी पावसाने पीक येण्याची अपेक्षा नाही, या चिंतेत ते होते. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून गेल्या गुरुवारी (दि. ७) शेतात विषारी औषध घेतले. उपचारासाठी कळमनुरी, नंतर िहगोली जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केले, मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने िहगोलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले असता रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे कळमनुरी येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे ६५ हजार रुपयांचे, तर गौळ बाजार येथील जिल्हा बँक शाखेचे ३ हजार रुपयांचे कर्ज होते.