राज्यामधील महाविकासआघाडी सरकारला नुकतेच शंभर दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोध्येला जाऊन प्रभू रामांचे दर्शनही घेतले. मात्र शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतरही एक गोष्ट होऊ शकली नाही याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली आहे. ही खंत व्यक्त करताना त्यांनी त्यांचे बंधू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख केला आहे.

रोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय मेळाव्यामध्ये बोलताना सुळे यांनी आधीच्या सरकारमधील मंत्र्यांना टोला लगावला. “उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयामध्ये भेटायला जायचं असेल तर ते अशक्य आहे. अजित पवार सकाळी सात वाजताच मंत्रालयामध्ये पोहचलेले असतात. दरवाजे उघडणाऱ्यांच्या आधीच दादा तिथे हजर असतात. याचे कारण म्हणून अजूनही आमच्या भावा सरकारी बंगला मिळालेला नाही,” असं सुळे यांनी सांगितलं.

“सरकार येऊन १०० दिवस उलटून गेले पण दादाला घर मिळालं नाही. आम्हाला तत्वज्ञान शिकवणारे बंगले सोडण्यास तयार नाही. त्यामुळेच आमच्या मंत्र्यांना बंगलेच मिळत नाही,” असा टोला सुळे यांनी भाजपाच्या मंत्र्यांना लगावला आहे.

भाजपा सरकारच्या काळामध्ये अर्थमंत्री असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांना शासकीय निवासस्थान म्हणून मलबारमधील देवगिरी बंगला देण्यात आला होता. महाविकास आघाडीचे सरकार येऊन शंभर दिवस उलटल्यानंतरही मुनगंटीवार यांनी देवगिरी बंगला सोडलेले नाही. त्यामुळे अजित पवार हे सध्या चर्चगेट परिसरातील एका इमारतीमध्ये वास्तव्यास आहेत.