भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक २’वर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला भारताच्या हवाई दलाचा अभिमान वाटतो. शहीद जवानांचे बलिदान वाया जाणार नाही हे पाकिस्तानला दाखवून दिले, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

मंगळवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राइक केले. पाकमधील बालाकोट येथील दहशतवादी संघटनांच्या तळांना हवाई दलाच्या विमानांनी लक्ष्य केले असून या तळांवर सुमारे २१ मिनिटे बॉम्बचा वर्षाव सुरु होता. या स्ट्राइकबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भारतीय सैन्याचा मला अभिमान वाटतो. आपल्या शहीद जवानांचे बलिदान वाया जाणार नाही हे पाकिस्तानला दाखवून दिले आहे’, असे फडणवीस यांनी सांगितले.

भारतीय हवाई दलाने जैश- ए- मोहम्मद आणि अन्य दहशतवादी संघटनांच्या तळांना लक्ष्य केले. या तळांवर प्रशिक्षण दिल्यानंतर हे दहशतवादी भारतात पाठवले जायचे. हे तळच उद्ध्वस्त करण्याचे काम झाले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी सैन्याच्या तिन्ही दलांना स्वातंत्र्य दिले होते. मोदींजींनी ज्या प्रकारे नेतृत्व आणि निर्णय क्षमता दाखवली, त्यांचेही आभार मानतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.