निलंगा येथील जि. प. प्रशालेच्या केंद्रावर नुकत्याच घेतलेल्या टंकलेखन परीक्षेत १ हजार ५०१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. मात्र, ३५० विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही! एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण काय, याची चर्चा आता होत आहे.
पुणे येथील राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ३ ते ७ जून दरम्यान शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा (टायिपग) घेण्यात आली. लातूर, औसा, उदगीर, अहमदपूर व निलंगा या तालुक्यांच्या ठिकाणी याची परीक्षा केंद्रे होती. संगणकाच्या जमान्यात टायिपग परीक्षेचे महत्त्व उरले नाही, असा सर्वसाधारण समज आहे. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी लिपीक म्हणून काम करताना मराठी, िहदी, इंग्रजी टायिपग परीक्षा उत्तीर्ण असणे व ३०, ४० व ६० अशा शब्दांची गती असणे आवश्यक असते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी टंकलेखन परीक्षेकडे वळतात.
निलंगा येथील केंद्रावर देवणी, औराद शहाजनी, कासारशिरसी, शिरूर अनंतपाळ, नळेगाव येथील १३ टायिपग इन्स्टिटय़ूटमधील विद्यार्थी परीक्षेस बसणार होते. येथील केंद्रप्रमुख भारत सातपुते यांनी सर्व संस्थांचालकांची परीक्षेच्या आधी दोन दिवस म्हणजे १ जूनला बठक घेतली. परीक्षा नियमानुसार होतील, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दिलेल्या वेळेत पेपर सोडवावे लागतील, कोणत्याही स्थितीत वेळ वाढवून दिला जाणार नाही, अशा सूचना दिल्या होत्या.
परीक्षेच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी परीक्षा केंद्रात दाखल झाले. परीक्षा नियंत्रकांनी सर्व विद्यार्थ्यांना जे परीक्षार्थी आहेत त्यांनीच परीक्षा द्यावी. सर्वाच्या ओळखपत्राची कडक तपासणी केली जाईल. तोतया विद्यार्थी आढळल्यास पोलिसांत दिले जाईल, अशा सूचना दिल्या. तेव्हा अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर निघून गेले. परीक्षा देणारे काही विद्यार्थी ‘हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून’ बसून राहिले. या परीक्षा केंद्रावर निलंगा येथील एकाच टंकलेखन संस्थेचे तब्बल ६०० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याची सुविधा या संस्थेत आहे काय, याची पाहणीही कधी केली जात नाही.
लातूर येथील एका संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना नळेगाव येथील संस्थेमार्फत निलंगा परीक्षा केंद्रावर परीक्षेस बसविण्याचा प्रताप केला. परीक्षेत हमखास यश मिळविण्यासाठी वर्षांनुवष्रे नवनवीन क्लृप्त्या या क्षेत्रातही सुरू होत्या. परीक्षा केंद्रात ७ मिनिटांऐवजी २ मिनिटे वेळ वाढवून दिली, तरी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उत्तीर्ण होतात. काही ठिकाणी निवडक मंडळीच अनेक विद्यार्थ्यांचे पेपर सोडवतात. टंकलेखन परीक्षेत कोणी कोणाचा पेपर सोडवला, हे कळणे दुरापास्त असते. या वर्षी केंद्रप्रमुखांनी कडक पावले उचलल्यामुळे विद्यार्थी अनुपस्थितीचे प्रमाण वाढले. अशा परीक्षा नेमक्या कधी होतात?, याचा निकाल कसा लागतो?, विद्यार्थी सराव करून परीक्षा देतात की नाही? या बाबत फारसे कोणी गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे नेमके काय घडते, हे सामान्य माणसांना कळत नाही.
साहजिकच परीक्षा ती कोणतीही असो, आपण परीक्षेला बसलो आहोत याचे भान विद्यार्थ्यांना असणे व परीक्षा घेणाऱ्यांनाही असणे आवश्यक आहे. हे भान सुटत चालल्यामुळे परीक्षेतील गरप्रकाराचे प्रमाण मोठे आहे.