“माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे हे आत्मचरीत्र लिहित असून लवकरच त्याचे प्रकाशन होईल. अब आएगा मजा, सबका हिसाब होगा”, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. आता नारायण राणे आत्मचरीत्रात काय गौप्यस्फोट करणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

आमदार नितेश राणे यांनी बुधवारी दुपारी ट्विट केले. या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात, माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे यांचे आत्मचरीत्र येणार असून अब आएगा मजा, सबका हिसाब होगा.

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नारायण राणे यांनी युतीचे सरकार असताना मुख्यमंत्रीपद भूषवले होते. आघाडीची सत्ता असताना त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली. नारायण राणे यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर रिंगणात उतरले असून सध्या ते राज्यसभेत खासदार आहे. भाजपाच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेत गेले आहेत. आता नारायण राणे यांच्या आत्मचरीत्रात नेमका काय उल्लेख असेल, शिवसेनेबाबत ते आत्मचरीत्रात काय लिहिणार, आत्मचरीत्रात मोठ्या नेत्यांबाबत काही गौप्यस्फोट करणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अब आयेगा मजा, सबका हिसाब होगा अशा शब्दांमध्ये त्यांचे पुत्र नितेश राणे यांनीच आत्मचरीत्राचं वर्णन केलं असल्यामुळे आणि नारायण राणे यांचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता ते अनेक मोठ्या लोकांची पोलखोल करतील असा अंदाज व्यक्त होत आहे.