उस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात आंदोलन केले. यावेळी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून साखर संचालकांच्या अंगावर भिरकावले. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद टळला.

२०१७-१८ या उस गाळप हंगामामधील थकीत प्रती टन २०० रुपये मिळावेत, तीन टप्यात देयके देण्याचे ऊस करार रद्द करुन नव्याने करार करावेत, स्वाभिमानीची ऊस परिषद झाल्याशिवाय कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत, यासह अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर आंदोलन केले. त्यांनी साखर सहसंचालक एन .आर. निकम यांच्याशी चर्चा केली. यावेळी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी निवेदन फाडून साखर संचालकांच्या अंगावर भिरकावले. शिवाय, जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला.

निकम यांनी कारखान्यांना नोटीसीद्वारे सूचना करण्यात येईल असे आश्‍वासन दिले. आंदोलनात स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, युवा आघाडीचे सागर शंभू शेटे, जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.