आगामी पावसाळा लक्षात घेता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प १ जुलैपासून अंशत: खुला ठेवण्यात येणार असून एकूण सहापैकी मोहुर्ली, नवेगांव, कोलारा व खुटवंडा हे चार प्रमुख प्रवेशव्दारातून ५० टक्के म्हणजे केवळ ५६ गाडय़ांना प्रवेश दिला जाणार आहे. ऑक्टोबपर्यंत हा नियम लागू राहणार असल्याचा आदेश वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान यांनी जारी केला आहे.
भगवान यांनी नुकतीच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ.जे.पी. गरड, कोरचे उपवनसंरक्षक कळसकर व अधिकाऱ्यांसोबत पावसाळय़ात व्याघ्र प्रकल्पात सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी आणि पावसाळी पर्यटनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत ताडोबा प्रकल्प १ जुलैपासून पर्यटकांसाठी अंशत: सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ताडोबा प्रकल्पाला मोहुर्ली, कोलारा-नवेगांव, जामनी, खुटवंडा, खातोडा व झरी असे सहा प्रवेशव्दार आहेत. यातील दोन प्रवेशव्दार पावसाळय़ात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून मोहुर्ली, नवेगांव, कोलारा व खुटवंडा या चार प्रवेशव्दारातूनच पर्यटकांच्या गाडय़ांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच ताडोबातील काही प्रमुख रस्ते नादुरूस्त असल्यामुळे ते बंद करण्यात येणार आहेत. मुख्य रस्ता पर्यटनासाठी खुला ठेवला जाणार आहे. ताडोबात आजच्या घडीला ११७ गाडय़ांना प्रवेश दिला जातो. मात्र पावसाळय़ात केवळ ५० टक्के जिप्सी व गाडय़ांना प्रवेश दिला जाणार आहे. विदेशी पर्यटकांसाठी ताडोबात प्रवेश शुल्क दहापटीने वाढविण्यात आलेले आहे. यासोबतच छायाचित्रकारांसाठी सलग ११ तासांच्या सफारीसाठी १५ हजारांवरून थेट २५ हजार रुपये शुल्क करण्यात आलेले आहे. विदेशी छायाचित्रकारांना २० हजारांऐवजी आता ४० हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मध्यंतरी छायाचित्रकारांच्या सलग ११ तासांच्या जंगल सफारीचा दुरुपयोग होत असल्याचे ताडोबा व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले होते. काहींनी तर ११ तासांच्या जंगल सफारीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन फेसबुक तसेच इतर समाज माध्यमांवरून करणे सुरू केले होते. त्यामुळेच ११ तासांच्या या सफारीसाठी शुल्कवाढ करण्यात आलेली आहे.