14 August 2020

News Flash

वनजमीन अतिक्रमण संदर्भात पूर्ण तपासणी करूनच कारवाई करा : वडेट्टीवार

सध्या वनविभागामार्फत अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरू आहे.

संग्रहीत छायाचित्र

वन हक्क कायद्या अनुसार आदिवासींना देण्यात आलेल्या जमिनीच्या पट्ट्याची प्रथम तपासणी करून, त्यानंतरच अतिक्रमण हटविण्यात बाबतची कार्यवाही अपेक्षित आहे. त्यामुळे प्रथम तपासणी करून नंतर यासंदर्भात कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

सध्या वनविभागामार्फत अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरू आहे. या संदर्भात काही प्रकरणे पोलिसात देखील दाखल करण्यात आली आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कोणतीही कारवाई तपासणीशिवाय होता कामा नये, असे निर्देश वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी काल दिले.

पालकमंत्री काल करोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी चंद्रपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, बफर क्षेत्राचे उपसंचालक गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक कुलराज सिंग, विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या कारवाई संदर्भातही आढावा बैठक घेतली.

आदिवासीबहुल असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वनहक्क कायद्याअंतर्गत जंगलातील आदिवासींना वनजमिनीचे पट्टे वाटप करण्यात येते. तर दुसरीकडे ताडोबा सारख्या अभयारण्याच्या संरक्षणासाठी हरित लवादाकडून वेगवेगळ्या प्रकारे निर्देश येत राहतात. या परिसरात कोणतेही अतिक्रमण होऊ नये. जंगलाच्या परिसरात वन्यजीवांचे अधिवास संरक्षित राहावे, यासाठी दिशानिर्देश वेळोवेळी दिल्या जातात.त्यामुळे अनेक वेळा जिल्ह्यांमध्ये वनपरिक्षेत्रात वन विभाग व आदिवासी यांच्यामध्ये तणाव निर्माण होतो. गेल्या काही दिवसांपासून उपसंचालक बफर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प याअंतर्गत अवैध वृक्षतोड व जमीन ताब्यात घेण्याच्या संदर्भात झालेल्या प्रकरणात वनविभागाने कारवाई केली आहे. वनविभागाच्या या कारवाईनंतर जंगला नजीकचा अधिवास असणाऱ्या आदिवासी बांधवांनी यासंदर्भात पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे या प्रकरणी तोडगा काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यासाठी वनविभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यासोबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर काल चर्चा केली.

वनविभागाने या वेळी आपली बाजू स्पष्ट करताना वनजमिनीवर अतिक्रमण संदर्भात वनहक्क अधिनियमांतर्गत समितीने दावे नामंजूर केले असल्यास, सदर अतिक्रमण धारकांनी वनजमिनीवर शेती न करता स्वतःहून सदर वनजमिनीवरील कब्जा सोडून वनविभागात सहकार्य करावे, असे आवाहन केले.

तर पालकमंत्र्यांनी वनविभागाने कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रथम कायदेशीर तपासणी करूनच अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले.पोलिसात तक्रारी दाखल करण्यापूर्वी दावे तपासून पाहिले गेले पाहिजे. या संदर्भातली अधिकृत माहिती घेतली गेली पाहिजे. तसेच जंगला शेजारील आदिवासींवर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांना विश्वासात घेऊन, तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून नेमकी परिस्थिती जाणून घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 3:28 pm

Web Title: take action only after thorough investigation regarding forest land encroachment vadettiwar msr 87
Next Stories
1 अमिताभ बच्चन, अभिषेक पाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्यालाही करोनाची लागण
2 ‘नया है वह’, म्हणत फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
3 आपण क्वारंटाइन झाल्याचं वृत्त खोटं, राज्यपाल कोश्यारी यांनी दिली माहिती
Just Now!
X