विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांची कोकण विभागीय आयुक्तांकडे मागणी

पनवेल नगर परिषद आणि पनवेलमधील सिडको वसाहतींचे रूपांतर महानगरपालिकेमध्ये होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास समिती स्थापन केल्याच्या वृत्तानंतर पनवेलमधील विविध राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी पहिले जनसुनावणी घ्या, नंतरच महानगरपालिका घोषित करा, अशी भूमिका घेऊन मंगळवारी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांना या मागणीचे पत्र दिले. पुढील दोन आठवडय़ांत सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली ही अभ्यास समिती आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपविणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात पनवेल महानगरपालिकेसाठी चाचपणी सुरू असल्याच्या वृत्तामुळे पनवेलमधील कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अगोदर पनवेलकरांचा पाणी प्रश्न सोडवा, शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला साडेबारा टक्केचा प्रश्न सोडवा, सिडको नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, त्यानंतरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पनवेल महानगरपालिका जाहीर करावी, असे या चारही राजकीय पक्षांचे म्हणणे आहे.
शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये आपसात कोणताही ताळमेळ नसल्याचे सांगत पनवेलमध्ये एकीकडे सिडको ३४ हजार कोटी रुपये खर्चून स्मार्ट सीटी उभारणार आहे. तसेच नैना प्रकल्प ही पनवेलमध्ये उभारणार आहे, हे जाहीर होत नाही तोच मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवीन महानगरपालिका होत असल्याचे संकेत दिल्याने हा सर्व खटाटोप आताच का या संशयाला वाव दिल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.