राज्यातील सत्तास्थापनेच्या वादातून भाजपाबरोबर युती तोडून व एनडीएमधुनही बाहेर पडलेल्या शिवसेनेने आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं. त्याबदल्यात शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत कमी असून, केंद्रानं अतिरिक्त मदत देण्याची मागणी करत शिवसेनेनं या मुद्यावर लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. त्याचबरोबर अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर लोकसभेतून सभात्याग केला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. सभात्याग करून कधीही विषय सुटत नाही असेही त्यांनी शिवसेनेला उद्देशुन म्हटले आहे.

निलेश राणे यांनी ”सभात्याग करून कधीही विषय सुटत नाही. सभागृहाच्या बाहेर टपोरी पण उभे राहू शकतात पण सभागृहात प्रश्न मांडून सोडवायला अक्कल लागते.” असे ट्विटद्वारे म्हणत शिवसेनेवर जोरादार टीका केले आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित जाहीर झाल्यापासून निलेश राणे यांनी शिवसेनेसह शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही ट्विटच्या माध्यमातून सातत्याने जोरदार टीका केल्याचे दिसून आले आहे.

काही दिवसांपूर्वीच निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. अतिहुशारी दाखवून तोंडावर आपटल्यामुळेच संजय राऊत आडवे झाले असल्याची टीका निलेश राणे यांनी केली होती. संजय राऊत यांना काहीही झालेलं नाही. शिवसैनिक फटकावतील आणि अति हुशारी दाखवून तोंडावर आपटले म्हणून ते मुद्दाम आडवे झाले आहेत. ते स्वत: चालत हॉस्पीटलमध्ये गेले आणि काही तासातच सगळी ऑपरेशनही करून झाली. लोकं मूर्ख नाहीत, अशा आशयाचं ट्विट निलेश राणे यांनी केलं होतं.