हेमेंद्र पाटील

तारापूरमध्ये महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे स्वामित्त्व धन हुकणार; २०० ट्रक मुरुमाचा भराव

तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांमधील मुरुमाचे बेकायदा पद्धतीने उत्खनन केले जात आहे. हा मुरुम एका खासगी कंपनीच्या आवारात टाकला जात आहे. कंपनीच्या वतीने केल्या जाणाऱ्या या मुरुमाचा वापर केला जाणार असल्याने तिथे मुरुमाचा भराव टाकला जात आहे. मात्र उत्खननासाठी घालून दिलेले स्वामित्व धन (रॉयल्टी) स्थानक प्रशासनाला दिले जात नसल्याचे उघड झाले आहे. याच वेळी  स्वामित्व धनाची आठ रुपयांची रक्कम मिळविण्यासाठी प्रशासनाने ही हालचाल केली नसल्याचे उघड झाले आहे. विनापरवाना उत्खनन केल्याने संबंधितांकडून दंडात्मक कारवाई म्हणून ३२ लाख रुपये वसूल केले जाणे अपेक्षित आहे.

बोईसर भागात अद्याप पावसाला सुरुवात झाली नसल्याने रोज हजारो ब्रास भराव केला जात आहे. याशिवाय मुख्य रस्त्यालगत भरावाची कामे स्वामित्व धन न घेताच सुरू असतानाही स्थानिक प्रशासनाने लक्ष घातलेले नाही. त्यामुळे सरकारी तिजोरीत येऊ घातलेल्या लाखो रुपयांच्या रकमेवर पाणी सोडले जात आहे.

बोईसर येथील खैरापाडा उड्डाणपुलाजवळ असलेल्या एका जागेवर गुरुवारी दिवसभर सुमारे २०० गाडय़ा मुरुमाचा भराव करण्यात आला. मोठय़ा प्रमाणात वाहने दिवसभर या ठिकाणी सुरू होती. कोणत्याही प्रकारची वाहतूक स्वामित्व धन (रॉयल्टी) नसताना वाहने सुरू असतानादेखील महसूल विभागाने साधी चौकशी केलेली नाही. पाऊस थांबला असल्याने कामे उरकून घेण्याचा प्रयत्न ठेकेदारांनी केला.

सरावली महसूल क्षेत्रात येणाऱ्या या भागात याआधीही अनेक ठिकाणी मातीचे बेकायदा भराव करण्यात आले होते. मात्र एकाद-दुसऱ्या ठिकाणी अहवाल पाठवण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. गौणखनिजांचा पुरवठा करणाऱ्या काही बडय़ा लोकांचा यात सहभाग असल्याने याकडे महसूल विभाग कारवाई करीत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

जागेवर केलेल्या मुरूम भरावाचे मोजमाप तातडीने करण्यात येईल व संबंधितांवर कारवाई केली जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी यांची सभा असल्याने त्वरित तेथे कोणत्याही अधिकाऱ्यांना जाता आले नाही.

– संदीप म्हात्रे, मंडळ अधिकारी बोईसर