X
Advertisement

‘तौते’ वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यांमध्ये संचारबंदी!

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नैसर्गिक संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज

अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ निर्माण झालेले ‘तौते’ वादळ जिल्ह्यात जमिनीवर प्रवेश करणार नाही. किनारपट्टीला समांतर राहत ते रायगड, मुंबईमार्गे मंगळवारी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. पण ताशी सुमारे ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रविवारी पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागात नुकसान होण्याचा संभव आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या नैसर्गिक संकटाला तोंड देण्यासाठी तयारी केली आहे.

याबाबत शनिवारी सायंकाळी पत्रकारांना माहिती देताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनाराण मिश्रा यांनी सांगितले की, वादळामुळे निर्माण होणाऱ्या वाऱ्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि मंडणगड या ५ तालुक्यांच्या किनारी भागात फटका बसण्याची शक्यता गृहित धरून या पाचही. तालुक्यांमध्ये रविवारी पहाटेपासून संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात झालेल्या ‘निसर्ग’ चक्री वादळाच्या तुलनेत या वादळाची नुकसानकारकता ५० टक्के आहे. त्यामध्ये मुख्यतः मोठी झाडे उन्मळून घरे, पत्र्यांची छपरे किंवा रस्त्यांचे नुकसान, वीजेचे खांब पडल्यास वीजपुरवठ्यात व्यत्यय आणि मोबाईल टॉवरचे नुकसान झाले तर संपर्क तुटण्याची शक्यता आहे. मात्र पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही.

Cyclone Tauktae : किनारपट्टीवर ६२, तर खाडीवरील ११५ गावांना सतर्कतेचा इशारा; समुद्र किनारे बंद

अशा परिस्थितीत संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी या पाच तालुक्यांमधील किनारपट्टीच्या भागातील गावांमध्ये रस्ते सफाई, आरोग्य व्यवस्था, लोकांना आवश्यक गरजा पुरवणे आणि बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. झाडे तोडून रस्ते मोकळे करण्यासाठी मोठे कटर, जेसीबी, बुलडोझर यासारखी यंत्रणाही सज ठेवण्यात आली आहे. गरज पडल्यास एनडीआरएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गावांमधील रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचीही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरु होत आहे.

तौते चक्रीवादळाचा रौद्रवतार! घरं जमीनदोस्त, वादळी पावसाने झाडं उन्मळून पडली

समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या ४७९ नौका किनाऱ्यांवर परतल्या असून आता समुद्रात एकही अधिकृत नौका नाही. सुमारे ४० ते ५० परप्रांतीय नौकाही जिल्ह्यातील बंदरात आश्रयाला आलेल्या आहेत. या नौकांवरील खलाशांची जवळच्या सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केली आहे, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी म्हणाले की, वादळानंतर रस्ते सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम आणि महामार्ग प्राधिकरण विभागाला सूचना दिल्या आहेत. या तालुक्यांमधील रुग्णालयांची वीज खंडित होणार नाहीत, याची काळजी घेतली आहे. तसेच तेथे प्राणवायूचा तुटवडा जाणवू नये म्हणून २० टन जादा साठा उपलब्ध आहे. कोल्हापूरहूनही तातडीच्या पुरवठ्यासाठी एक टँकर ठेवण्यात आला आहे.

Cyclone Tauktae : केरळ, तामिळनाडूला ऑरेंज अ‍ॅलर्ट, गंभीर पूरस्थितीचा धोका!

दरम्यान या वादळाची जिल्ह्यात शनिवारी दुपारपासूनच चाहूल लागली असून काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. किनारी भागात वारेही वाहत असून समुद्र खवळला आहे. रत्नागिरी शहरासह तालुक्यात कुरतडे, तोणदे, पावस, गणपतीपुळे परिसरात वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण शहर परिसरासह गुहागर तालुक्यातील काही ठिकाणी सायंकाळी मोठ्या सरींसह पाऊस झाला. दापोली तालुक्यातील हर्णे येथील किनारी भागात असलेला वादळाचा धोका लक्षात घेऊन रहिवाशांना स्थलांतरित करण्याच्या हालचाली सायंकाळी उशीरा सुरु झाल्या होत्या.

21
READ IN APP
X