‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।’ अशी मराठी भाषेची थोरवी सांगितली जाते. मराठी भाषेनं परदेशातील अनेकांना भूरळ घातली आहे. अनेकांनी मराठी आत्मसात केल्याचीही अनेक उदाहरण आहेत. यात आता चक्क ब्रिटनच्या भारतातील राजदूतांनी मराठी शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्याला मराठी शिकवावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

मराठी भाषा दिनानिमित्तानं अॅलन जेमेल यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मराठीतून सर्वांना शुभेच्छा दिल्या असून, एक विनंतीही केली आहे. “सध्या मी हिंदी भाषा शिकत आहे. मला आशा आहे की, यानिमित्ताने मला आदित्य ठाकरे हे मराठीही शिकवावी. सर्व मराठी भाषिकांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,” असं जेमेल यांनी म्हटलं आहे.

मराठी जागतिक भाषा व्हावी…

“मराठी ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या दहा भाषांपैकी आहे. मराठीला हजारो वर्षांची समृद्ध, गौरवशाली परंपरा आहे. अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. हे करत असतानाच मराठी भाषेची उपयोगिता वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मराठी  ‘ज्ञानभाषा’ झाली पाहिजे. जागतिक स्तरावर संपर्क, संवाद, व्यवहाराची भाषा म्हणून मराठीला स्थान मिळाले पाहिजे. संगणकाच्या आज्ञावली मराठीत विकसित झाल्या पाहिजेत,” असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं होतं.

“राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच औद्योगिक, आर्थिक, न्यायालयीन क्षेत्रातही मराठी भाषेचा वापर जाणीवपूर्वक वाढवला पाहिजे. याची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून वैयक्तिक जीवनात, व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करून करावी,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.