पवित्र संकेतस्थळाद्वारे गेले वर्षभर सुरू असलेल्या शिक्षक भरतीतील दुसऱ्या टप्प्यातील भरतीच्या प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत राहिलेल्या त्रुटींची दुरुस्ती करतानाच भरती प्रक्रियेपासून वंचित घटकांचा विचार करून दुसरा टप्पा राबवण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

जवळपास सात वर्षांनंतर राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. शिक्षक होण्यासाठी उत्सुक असलेल्या राज्यातील हजारो उमेदवारांचे लक्ष शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याकडे लागले आहे.

पहिल्या टप्प्यात निवडलेल्या उमेदवारांना सप्टेंबरमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया राबवता आली नाही. आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भातील प्रक्रियेची माहिती शिक्षण विभागाने पवित्र संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यात बृहन्मुंबई महापालिका शाळा, उर्दू माध्यमाच्या शाळातील रिक्त राहिलेली पदे, खासगी संस्थांतील पदांची निवड यादी, माजी सैनिक प्रवर्गातील निवड यादी, मुलाखतीसह खासगी संस्थांतील पदांसाठीची निवड यादी या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात काही पदांसंदर्भात तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. या अडचणी शिक्षण विभागाकडून दूर करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने या प्रक्रियेत काही बदल झाले आहेत. या बदलांनुसार ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.