बोईसरसहित दहा गावांतील नागरिकांकडून अल्प प्रतिसाद

पालघर : बोईसर व परिसरातील आठ ते दहा ग्रामपंचायतीत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांकडून घरोघरी फिरून सुरू करण्यात आलेले करोना आजाराचे सर्वेक्षण नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने हा उपक्रम निव्वळ औपचारिकता ठरली आहे. या सर्वेक्षणादरम्यान शिक्षकांना नागरिक खरी माहिती देत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याच वेळी परिसरात झपाटय़ाने रुग्णसंख्या वाढत असताना सर्वेक्षणात मात्र सर्व आलबेल असल्याचे दिसून येत आहे.

आरोग्य सेविका, आशा भगिनी तसेच अंगणवाडी सेविका यांच्याकडून या प्रकारचे सर्वेक्षण करोना संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात करण्यात आला होता. मात्र गेल्या महिन्याभरापासून बोईसर व औद्योगिक वसाहतीच्या परिसरात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता करोना आजाराच्या लक्षणांची माहिती घेण्यासाठी सुमारे ४०० जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते.

बोईसर, सरावली, खैरेपाडा, दांडीपाडा, पास्थळ या गावांमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती, इतर आजाराने व्याधीत असलेल्या नागरिक तसेच करोना आजाराची लक्षणे याची माहिती संकलित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. नागरिकांकडून कुटुंबातील सदस्यांची माहिती दिली जात असली तरी ताप, सर्दी, खोकला, श्वसनाचे विकार किंवा थकवा येणे इत्यादी लक्षणांबाबत नागरिकांकडून सर्वेक्षण करताना माहिती पुरवली जात नसल्याचे समजले आहे.

शिक्षक आपला जीव धोक्यात टाकून या विशेष मोहिमेला सहकार्य करीत असताना नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाच्या या प्रयत्नाला अपेक्षित प्रतिसाद देण्यात येत नसल्यामुळे शासकीय प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. याबाबत या अभियानाचे प्रमुख समन्वयक डॉ. गणेश पांचाळ यांच्याशी संपर्क साधला असता आशा वर्करकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणापेक्षा शिक्षकांना नागरिक अधिक प्रमाणात सहकार्य करीत असल्याचे सांगितले. हे सर्वेक्षण अजूनही सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर प्राप्त माहिती संकलित करून त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल असे डॉ. पांचाळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. दरम्यान या सर्वेक्षणाच्या कामात सहभागी न होणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांना कारवाई करण्याची भीती जिल्हा प्रशासनाने दाखविली होती. मात्र त्याचे फलित निघत नसल्याने संपूर्ण बोईसर परिसर ठणठणीत व तंदुरुस्त असल्याचे दिशाभूल करणारे चित्र या सर्वेक्षणातून पुढे येत आहे.

सर्वेक्षणाबाबत भीती कायम

या सर्वेक्षणादरम्यान खरी माहिती दिली तर शासकीय अधिकारी आपल्याला विलगीकरण कक्षात डांबून टाकतील अशी भीती असल्याने अनेक नागरिक सर्वेक्षणादरम्यान आपले दरवाजे बंद ठेवण्याचे पसंत करीत असल्याचे दिसून येते. अनेक कामगार आपल्या नोकऱ्या गमावून बसल्याने ते आपल्या मूळ गावी परतले असल्याने सुमारे ३० ते ४० टक्के घरे बंद आहेत. तर काही मंडळी कामावर असल्याने दरवाजे बंद असतात. उर्वरित लोकांनी माहिती देताना आजाराची माहिती दडवत असल्याने सर्वेक्षणात क्वचितच एखाद्याला आजाराची लक्षणे असल्याचे दिसून येत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात बोईसर व लगतच्या भागात रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढत असून आजारातून लवकर बरे होण्यासाठी नागरिकांनी लवकरात लवकर उपचार घेणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

शिक्षकांची दैना

या सर्वेक्षणासाठी शिक्षकांना कामाला जुंपताना त्यांना कोणत्याही प्रकारचा स्वतंत्र लेखी आदेश दिला नसल्याचे शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. दूरवर राहणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांना बोईसर परिसरात सर्वेक्षणाचे काम दिले गेल्याने अनेक शिक्षकांनी या सर्वेक्षणात सहभागी होत नसल्याचे दिसून आले आहे. शिक्षकांना एक पातळ नायलॉन कपडय़ाचे मास्क व एक हात मोज्याचा जोड दिला गेला असून दोन शिक्षकांना मिळून एक वही, लहान सॅनिटायझरची बाटली दिली गेली आहे. आजाराने ग्रासलेल्या भागात शिक्षक सर्वेक्षण करत असताना शासनाने दिलेले सुरक्षा उपकरणे निकृष्ट दर्जाची व अपुरी असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. दररोज शिक्षकांकडून जेमतेम ३० ते ४० घरांचे सर्वेक्षण होत असल्यामुळे अडीचशे ते तीनशे घरांचे क्षेत्र करण्यासाठी शिक्षकांना आठवडय़ाचा अवधी लागत आहे. आरोग्य विभागाकडून पुरवण्यात आलेल्या वैयक्तिक सुरक्षा उपकरणाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे वापर असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून केल्या जात आहेत.