उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या साहित्य वाटपास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मंगळवारी येथे मज्जाव केल्यामुळे शिक्षण मंडळाच्या पथकाला माघारी फिरावे लागले. या साहित्याचे वितरणच न झाल्यामुळे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेची प्रक्रिया कशी पार पडणार, याबद्दल विद्यार्थी व पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांवर निर्णय होईपर्यंत परीक्षेवर बहिष्कार आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
यंदा उपरोक्त परीक्षांच्या पाश्र्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात आले. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेची गुणतक्ते आणि प्रविष्ठ विद्यार्थ्यांची यादी तत्सम सर्व साहित्याचे वितरण सुरू झाले आहे. या वितरणात अडथळा आणण्याचा इशारा संघटनांनी दिला होता. त्यानुसार नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, ऑल इंडिया टिचर्स फोरम आणि पीडीएफ या संघटनांचे पदाधिकारी व सदस्य येथील या. ना. जाधव महाविद्यालयासमोर जमा झाले. या ठिकाणी मंडळाकडून येवला, मालेगाव, नांदगाव, चांदवड, देवळा, सटाणा तालुक्यातील परीक्षा साहित्याचे वितरण केले जाणार होते. तथापि, २०० शिक्षकांनी महाविद्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करत साहित्य वाटपास मज्जाव केला.
मंडळाकडून प्रात्यक्षिक परीक्षेच्या चाललेल्या तयारीत या आंदोलनामुळे अवरोध निर्माण झाला आहे. तरी देखील मंडळाने परीक्षा नियोजनानुसार होणार असल्याचे म्हटले आहे. बुधवारी नाशिक शहरात हे वितरण केले जाणार आहे. तर ते यशस्वी होऊ न देण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.