चारोटी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा; चालक-टोल कर्मचाऱ्यांच्या वादाने प्रवासी त्रस्त

विजय राऊत, लोकसत्ता

कासा : संपूर्ण देशभर १६ फेब्रुवारीपासून  फास्टॅग प्रणालीचा वापर करणे सर्वच वाहनचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या प्रणालीत तांत्रिक गोंधळ निर्माण झाल्याने त्याचा फटका वाहनचालकांसह प्रवाशांनाही बसू लागला आहे. टोल नाक्यावर वाहनचालक आणि टोल कर्मचारी यांच्यात खटके उडत असल्याने टोलनाक्यावर वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या लांबचलांब रांगा पाहण्यास मिळत आहे.

फास्टॅग प्रणाली येण्याच्या अगोदर टोल नाक्यावर रोखीने व्यवहार होत होते. त्यामुळे रोखीचा व्यवहार करताना बराच वेळ वाया जात असे.  सुटय़ा पैशांवरून वाहनचालक आणि टोल कर्मचारी यांच्यात वाद होत असत त्यामुळे टोल नाक्यावर गर्दी होऊन वाहनचालकांचा वेळ आणि वाहनांचे इंधन दोन्ही वाया जात होते. या सर्वावर उपाय म्हणून फास्टॅग प्रणालीची यंत्रणा लागू करण्यात आली.  फास्टॅगमुळे टोल नाक्यांवरील रागांमधून लवकरच मुक्ती मिळेल, असा सरकारचा दावा होता. १६ फेब्रुवारीपासून फास्टॅग वापरणे सक्तीचे केले आहे. फास्टॅग नसेल तर वाहनचालकांना टोलची दुप्पट  रक्कम भरावी लागत आहे.

परंतु ही सक्ती सुरू झाल्यानंतर बुधवारी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरवर रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले. हीच स्थिती देशभरातील सर्वच टोल नाक्यावर पाहायला मिळत आहे . चारोटी टोल नाक्यावर फास्टॅग स्टिकर स्कॅन न झाल्याने टोल कर्मचारी टोलची दुप्पट रक्कम भरायला सांगताना दिसत होते.  त्यामुळे वाहनचालक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये वाद  होत आहेत.   त्याचा परिणामा वाहतुकीवर होत आहे.  वाहनांच्या रांगा लागत आहेत. या गोंधळामुळे बुधवारी टोल नाक्यावर दोन ते तीन किमी अंतरापर्यंत रांगा लागल्याचे दिसत होते. कोंडीतून बाहेर पडण्यासाठी   वाहन चालकांनी आपली वाहने विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवरून चालवू लागले  आहेत.  त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

या वाहनांच्या गर्दीचा फटका एका रुग्णवाहिकेला ही बसल्याचे पाहण्यास मिळाले.  टोल नाक्यावर वाहनांची गर्दी वाढल्यास टोल बंद करून वाहनांना सोडून देण्यात यावे व गर्दी कमी करावी असा नियम असतानाही आयआरबी कंपनी या नियमांचे कधीही पालन करताना दिसत नाही. तसेच वाहतूक पोलिसही फक्त दंड वसूल करण्याचेच काम करताना दिसतात  या समस्यांवर आयआरबी कंपनीने तोडगा काढून होणारी गर्दी टाळावी व वाहनचालकांना होणारा मनस्ताप दूर करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

वाहनाच्या गर्दीवर काय तोडगा काढता येईल याविषयी आयआरबी कंपनी प्रशासनाने बोलण्यास नकार दिला.एकंदरीत फास्टॅग प्रणालीमुळे वेळ आणि इंधन वाचण्याचा जो दावा केला जात होता त्या दाव्याला ब्रेक लागल्याचे चित्र चारोटी टोल नाक्यावर पाहायला मिळत आहे.

ट्रक मालकांची अनोखी शक्कल

चारोटी टोलनाक्यावर टोल चुकवेगिरी करण्यासाठी ट्रक मालक मोटारीचा फास्टॅग स्टीकर ट्रकला वापरून टोल प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक   करत होते. टोल व्यवस्थापनाच्या वसुलीत तफावत जाणवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  टोल व्यवस्थापनाने याबाबत कडक शिस्त व धोरण राबवून आतापर्यंत ११ ट्रकच्या मालकांकडून फसवणूक केल्याप्रकरणी ३७ हजार रुपयांची वसूली केली आहे.  चारोटी येथील टोल नाक्यावर मोटार ६५ रुपये, टेम्पो ११५ रुपये, ट्रक २३० रुपये तर मोठय़ा गाडय़ांसाठी ३७० रुपये टोल आकारण्यात येतो. परंतु या टोल नाक्यावर ट्रकच्या मालकांनी अनोखी शक्कल लढवत ट्रकसाठी मोटारीचे फास्टॅग स्टिकर लावले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ट्रकचा २३० रुपये टोल न देता ६५ रुपये टोल भरत या गाडय़ा टोल प्रशासनाची आर्थिक फसवणूक करत होत्या. यापुढे असे प्रकार आढळून आल्यास तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे टोल व्यवस्थापक दीपक फाटक यांनी सांगितले आहे.

तिप्पट टोल भरण्याची वेळ

बऱ्याचदा फास्टॅग स्टिकर स्कॅन न झाल्याने रोखीने टोल भरल्यानंतर काही वेळाने टोल ची रक्कम फास्टॅग मधून वसूल केल्याचाही  संदेश वाहन चालकांना येत आहे. त्यामुळे दुप्पट टोल आणि पुन्हा फास्टॅगमधूनही टोल वसुली असा तिप्पट टोल भरावा लागत आहे.  त्यामुळे वाहन चालक-मालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.