25 November 2020

News Flash

‘तेर’ची मांडली थेरं; महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा असलेल्या प्राचीन स्थळाकडे अक्षम्य दुर्लक्ष

या प्राचीन वारशाची अवस्था अक्षरश: 'नाही चिरा नाही पणती' म्हणावी अशी आहे.

धवल कुलकर्णी

एकीकडे राज्य व केंद्र शासन महापुरुषांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या स्मारकांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना, दुसरीकडे महाराष्ट्राचा व भारताचाही एक अनमोल ऐतिहासिक वारसा असलेल्या प्राचीन स्थळाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले तेर ही कधी काळातली सातवाहन कालीन पुरातन व्यापारी पेठ. आज मुंबईपासून साधारणपणे साडेचारशे किलोमीटरवर असलेले एकेकाळचे हे प्राचीन नगर चिनी प्रवासी ह्युएन सांग यांच्या लेखनातही आढळते. ही नगरी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ते इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत पूर्व सातवाहन, सातवाहन, उत्तर सातवाहन ते वाकाटकांच्या कालखंडापर्यंत वसली होती.

सातवाहनांच्या काळात तर तगर उन्नतीच्या अत्युच्च शिखरावर होते. पण नंतरच्या काळात बदललेले हवामान शुष्क वातावरण व दुष्काळ यांच्यामुळे ही संस्कृती हळूहळू लयाला गेली. सातवाहनांच्या काळात तगरचा संबंध हा थेट रोमन साम्राज्याशी होता. भारताला रोम सोबत जोडणार्‍या व्यापारी मार्गावर तगर एक महत्त्वाचं स्थान होतं. आजही तिथे असलेलं पाचव्या शतकातील त्रिविक्रम मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात जुनं असं विटांचं बांधकाम असलेलं मंदिर आहे.

सर्वधर्म समभाव हा जरी आज परवलीचा शब्द असला तरी प्राचीन काळात सातवाहनांनी तो कृतीत उतरून दाखवला होता. स्वतः वैदिक हिंदू असून सुद्धा सातवाहनांनी बौद्ध धर्माला मदत केली होती. आजही तेरला हिंदू, बौद्ध, जैन, इस्लामी अशा सर्व प्रकारचे धार्मिक स्थळ सापडतात.

अलीकडच्या काळात झालेल्या उत्खननामध्ये तेरला अत्यंत बहुमूल्य अशा गोष्टी सापडल्या. आज घरोघरी खाल्ली जाणारी खिचडी ही तेरला 2200 वर्षापूर्वी बनवली जात होती हे ऐकून अनेकांना धक्का बसला. तसेच तेरला सापडलेल्या एका हस्तीदंताच्या बाहुलीसारखी दुसरी एक बाहुली इटलीमधल्या पोंपे येथे आहे.

तेरला प्राचीन काळात लाकडाची तटबंदी होती असेही लक्षात आले आहे. तेरच्या प्रत्येक कोपऱ्यात अशा इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत. कधी कुणाच्या अंगणात एखादी प्राचीन वस्तू सापडते तर कधी शेतात. 2000 च्या आसपास एका शेतकऱ्याला तर आपल्या जमिनीत एक कुंड सापडला!

या प्राचीन वारशाची अवस्था अक्षरश: ‘नाही चिरा नाही पणती’ म्हणावी अशी आहे. तेरला दहा टेकड्या होत्या, ज्यांच्या खाली उत्खनन केल्यावर बरेच पुरातत्वीय अवशेष सापडले असते. दुर्देवाने यातल्या तीन टेकड्या या उध्वस्त झाल्या आहेत. कारण, अनेक मंडळींनी ही माती काढून त्याची बांधकाम व वीटभट्टी यांसाठी विक्री केली किंवा त्याचा खत म्हणून वापर केला. तेरमध्ये उत्खनन केलेल्या एका पुरातत्त्व शास्त्रज्ञाच्या मते ह्यामुळे अनेक अनमोल असे ऐवज, उदाहरणार्थ भांडी, दागिने, खेळणी व बाहुल्या एक तर नष्ट झाले असतील किंवा त्यांची विक्री झाली असेल. समाज या महत्त्वाच्या ऐवजला कदाचित कायमस्वरूपी मुकला असेल हे वेगळे सांगायला नको…

आज तेरला एकूण सात टेकड्या शिल्लक आहेत. म्हणजे, कोट, बैराग, कैकाडी, मुलानी, महार, रेणुका आणि चहुत्रे. या पैकी फक्त रेणुका, कोट व बैराग येथे उत्खनन झाले आहे, अन्य ठिकाणी नाही. हे उत्खनन मोरेश्वर दीक्षित, शा. बा. देव व माया पाटील यांच्यासारख्या तज्ञांनी केले आहे.

“या टेकड्यांची अवस्था आज फार भयंकर आहे. यांचे संरक्षण करणे व मातीचे उत्खनन रोखण्यासाठी रखवालदार नेमणे फार गरजेचे आहे. आम्ही तिथे अनेकदा जायचो. त्यावेळेला लोकांनी तेथे संडास केलेली असल्याचे लक्षात यायचे. पूर्वी तिथे एक रखवालदार होता. पण, तो आता सेवानिवृत्त झालेला आहे. अर्थात एक रखवालदार काय सात टेकड्यांवर पसरलेल्या विस्तीर्ण प्रदेशावर एकटाच रखवालदारी करू शकत नाही. स्थानिक लोकांना या वारशाचे महत्त्व पटवून सांगितले पाहिजे. या वारशाची जपणूक करण्यात त्यांचे भले आहे, हे जर दाखवून द्यायचे असेल तर त्यासाठी पर्यटन प्रकल्प हाती घ्यायला हवा. यामध्ये स्थानिकांचाही सहभाग असेल. पंचक्रोशीत स्वच्छता मोहीम राबवली तर तिथे उघड्यावर संडासला जाण्याचे प्रकार थांबतील,” असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 12:04 pm

Web Title: tere village of osmanabad district ancient civilizations have become clear even today but dhk 81
Next Stories
1 शरद पवारांनी सांगितल्या तीन गोष्टी अन् काँग्रेस सेनेसोबत येण्यास तयार झाली
2 “पक्षातील लोकांमुळेच पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव”
3 सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको – रोहित पवार
Just Now!
X