नागरिकांवर गस्तीपथकाद्वारे पाळत

वसई: करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र कडक र्निबध लागू असतानाही नागरिक नियम पायदळी तुडवत संध्याकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडून गर्दी करू लागले आहेत. मात्र सोमवारी संध्याकाळच्या सुमारास उमेळमान येथे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी नेमलेल्या पोलिसांचा ताफा येताच नागरिकांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आले आहे.

वसई-विरार शहरात दिवसेंदिवस करोनाचा कहर अधिकच वाढत असून रुग्णसंख्या ही झपाटय़ाने वाढली आहे. शहरातील करोनाबाधितांच्या रुग्ण संख्येने ५५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर काही रुग्ण दगावत आहेत. तरीसुद्धा काही नागरिकांना याचे गांभीर्य समजले नसून नागरिक हे विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. या विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी शहरात पोलिसांची विविध पथकेही नेमली आहेत. दंडात्मक कारवाई सोबतच आता जे विनाकारण फिरताना आढळून येतील त्यांची अँटिजेन चाचणी करण्याची मोहीमही हाती घेतली आहे.

वसई पश्चिमेतील उमेळमान येथील मोकळ्या मैदानात व आजूबाजूच्या परिसरात मोठय़ा संख्येने नागरिक घराच्या विनाकारण बाहेर पडून फेरफटका मारण्यासाठी येत आहेत. सोमवारी संध्याकाळीसुद्धा अशीच गर्दी या ठिकाणी जमली होती. पोलिसांचे कारवाई पथक अचानक या भागात दाखल झाले. कारवाईसाठी पोलीस आल्याची माहिती मिळताच मोकळ्या मैदानात फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली होती. कारवाईपासून वाचण्यासाठी नागरिक ज्या ठिकाणी रस्ता मिळेल त्या ठिकाणी सैरावैरा पळत होती. पोलीस ही या सैरावैरा पळणाऱ्या नागरिकांचा पाठलाग करीत होते. याची चित्रफीत सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होऊ लागली आहे.