कोल्हापूर : आणीबाणीच्या काळात बंदिवान झालेल्या व्यक्तींचे सन्मानधन बंद करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर येथे टीका होत आहे. राज्य शासनाचा हा निर्णय चुकीचा असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्ह्यात उमटत आहेत.काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या विरोधात त्या वेळच्या विरोधकांनी आवाज उठवला होता. आणीबाणी विरोधात आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. या सत्याग्रहींना सन्मान निधी देण्याचा निर्णय मध्य प्रदेशने घेतला होता. त्याचे अनुकरण महाराष्ट्र शासनाने केले होते.

न्यायालयात दाद मागणार

आता करोनाचे कारण दाखवून शासनाने सन्माननिधी देण्याचा निर्णय बंद केला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात लाभार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. कोल्हापुरातील प्रफुल्ल जोशी यांना या अंतर्गत शिक्षा झाली होती. त्यांनी हे सन्मानधन स्वीकारायचे नाही असा निर्णय घेतला होता. तथापि राज्य शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचे मत त्यांनी शुक्रवारी व्यक्त केले. तर इचलकरंजीतील अनिल दंडगे यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. एक महिना पेक्षा अधिक शिक्षा झालेल्यांना दरमहा दहा हजार तर त्याहून कमी शिक्षा झालेल्यांना दरमहा पाच हजार रुपये सन्मानधन दिले जात होते, असे त्यांनी सांगितले.