टाळेबंदीमुळे शहरालगतच्या शांती नगरातील झोपडपट्टी परिसरातील वृद्ध दाम्पत्यासमोर जीवन मरणाचा प्रश्न उभा ठाकला होता. याची माहिती मिळाल्यानंतर आमदार डॉ.पंकज भोयर यांनी तातडीने पावलं उचलत शुक्रवारी दाम्पत्याला सरकारी योजनेतून शिधा व राशन कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली. सोबतच वंचितांना तातडीने राशन कार्ड उपलब्ध करून देण्याची सूचना अन्न पुरवठा विभागाच्या अधिका-यांना दिली.

उमरी ग्रामपंचायत क्षेत्रातंर्गत येणा-या शांती नगरात रामदास गोविंदा मडावी (66) व बेबीबाई रामदास मडावी (60) हे वृद्ध दाम्पत्य सरकारी जमीनीवर एका झोपडीत मागील 10 ते 12 वर्षांपासून वास्तव्यास आहे. परंतु कोरानाकाळ व म्हातारपणामुळे आज त्यांना रोजगार मिळणे दुरापस्त झाले आहे. दोघांच्या हातात आता त्राण नसल्याने अवघड काम करणे त्यांना कठीण झाले.निरक्षर असल्याने सरकारी योजनांची माहिती देखील तोकडी.त्यामुळे या दाम्पत्याला राशन कार्ड सुद्धा मिळाले नाही. केवळ बेबीबाई यांच्याकडे आधार कार्ड आहे. तर त्यांचे पती रामदास यांनी तर आधार कार्डच काढले नाही. तथापि, सरकारी योजनापासून दोघेही अपात्र राहिले आहेत.

रोजच्या कमाईतून ते आपला उदरनिर्वाह करीत होते. पण आता लॉकडाउनमुळे रोजगाराचे साधन नसल्याने त्यांच्या समोर जगण्याचा भीषण प्रश्न उभा ठाकला होता. पोटाची भूक कशी विझवायची या विवंचनेत ते दोघे होते. दरम्यान याची माहिती आमदार डॉ.पंकज भोयर यांना मिळाल्यानंतर त्यांनी आज शुक्रवारी तातडीने पावले उचलली. आमदार डॉ.पंकज भोयर यांनी सकाळीच वृद्धेचे घर गाठत दोघांची आस्थेने चौकशी केली. पुरवठा विभागाचे अधिकारी प्रज्वल पाथरे यांना तातडीने शिधा देण्यासाठी टोकन देण्याचे निर्देश देवून राशनकार्ड देण्याची सूचना केली.परिणामी पुरवठा अधिकारी पाथरे यांनी त्वरीत  टोकण देत वृद्ध दाम्पत्याला शिधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर आमदार डॉ.पंकज भोयर यांनी मडावी दाम्पत्याच्या शिधा स्वाधीन केली.

करोना संसर्गामुळे लॉकडाउन असल्याने अनेकांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. स्थानिक व परप्रांतीय मजुरांजवळ राशन कार्ड नसल्याने त्यांना धान्य उपलब्ध होत नाही. केंद्र व राज्य सरकार धान्य उपलब्ध करून देत असल्याने वंचितांना तातडीने शिधा उपलब्ध करून दयाव्या, असे निर्देश आमदार डॉ.पंकज भोयर यांनी संबधितांना दिले,