निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम छायाचित्र मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाला ९ जूनपासून सुरुवात झाली असून येत्या ३१ जुल रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी नंदकुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१ जानेवारी २०१४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्या मतदारांनी १ जानेवारी २०१४ रोजी वयाची १८ वष्रे पूर्ण केलेली आहेत. परंतु त्यांचे नाव मतदार यादीत नोंदलेले नाही किंवा नाव नोंदलेले असून छायाचित्र दिलेले नाही किंवा चुकीच्या नावाची नोंद झालेली आहे, अशी सर्वानी एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या पुनरिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जाधव यांनी यावेळी केले.
या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये ३१ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आणि यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेली पुरवणी यादी प्रारूप छायाचित्र मतदार यादी म्हणून गृहीत करण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांचे ९ जून ते ३० जून या कालावधीमध्ये दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे.
दरम्यान २१ जून, २२ जून, २८ जून, २९ जून या चार दिवसांमध्ये मतदार केंद्रावर बुथ लेव्हल ऑफिसर आणि राजकीय पक्षांचे बुथ लेव्हल एजंट उपस्थित राहून मतदार यादीचे वाचन करणार असून त्यामध्ये हरकत असल्यास नोंदवून घेणार आहेत. १५ जुलपर्यंत प्राप्त दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहेत. २५ जुलपर्यंत डाटाबेसचे अद्यावतीकरण करण्यात येणार आहे, तर ३१ जुल रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल असे जाधव यांनी सांगितले.
या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मतदार यादीत नाव नोंदविताना १ जानेवारी २०१४ रोजी १८ वष्रे पूर्ण झालेल्या मतदारालाच विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मतदार यादीमध्ये मतदारांचे छायाचित्र नसल्यास मतदारांनी आपले पासपोर्ट साईज फोटो तहसील कार्यालयातील मतदान केंद्रामध्ये अथवा मतदान केंद्राचे केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करायचे आहेत. त्याशिवाय मतदार यादीतील आपले नाव योग्य असल्याची खात्री करण्याची जबाबदारीही मतदारांचीच राहणार आहे. असेही जाधव यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात २ टक्के मतदार ओळखपत्राविनाच!
१ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीमध्ये १२ लाख १३ हजार ८७१
मतदारांचा समावेश आहे. त्यातील ११ लाख ८४ हजार ४८१ मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये छायाचित्र आहेत, तर ११ लाख ८६ हजार ५५२ मतदारांकडे छायाचित्र ओळखपत्रे आहेत. २.२३ टक्के मतदारांची मतदार यादीत छायाचित्रे नाहीत, तर २.०५ टक्के मतदारांकडे ओळखपत्रे नाहीत.