शिक्षण क्षेत्रात भारताने पूर्वी जगात आदर्शवत स्थान प्राप्त केले होते. हे गतवैभव पुन्हा मिळवून देण्यास देशवासीयांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन राष्ट्रपती डॉ. प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी केले.
दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या सांगता समारंभात राष्ट्रपती मुखर्जी बोलत होते. राज्यपाल के. शंकर नारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, पालकमंत्री सतेज पाटील, संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सुवर्णमहोत्सव समितीचे संयोजक अरिवद सोनवणे व सचिव रमेश बियाणी व्यासपीठावर उपस्थित होते.
राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले, ‘‘सन १८०० पर्यंत जगभरात भारतीय विद्यापीठांचा दबदबा होता. इसवी सनाच्या ६०० वर्षे आधी तक्षशिला विद्यापीठाची स्थापना झाली. नालंदा, विक्रमशिला, वल्लभी, सोमपुरा व उदांतपुरी या विद्यापीठांनाही जगभर मान्यता होती. परंतु, नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार जगातील २०० मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये एकाही भारतीय विद्यापीठाचा समावेश नाही. शिक्षणातील गुणवत्तेची ही घसरण चिंताजनक आहे. देशात २ कोटी ६० लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. बाराव्या योजनेअखेर ३ कोटी ६० लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेतील अशी अपेक्षा आहे. देशात ६५० विद्यापीठे व ३३ हजार महाविद्यालये आहेत. मात्र, अधिक गुणवत्ता देणाऱ्या महाविद्यालयांची संख्या नगण्य आहे. जगभरातील संख्येने दुसऱ्या क्रमांकाचे उच्च शिक्षण भारतात दिले जात असतानाही, केवळ ७ टक्के विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. जर्मनीत हे प्रमाण २१ टक्के, तर अमेरिकेत ३४ टक्के आहे. अधिकाधिक विद्यार्थी उच्च शिक्षण घेतील यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्यांची संख्याही भारतात नगण्य आहे. सी. व्ही. रमण यांनी कोलकाता विद्यापीठात शिक्षण घेऊन नोबेल पारितोषिक मिळविले. त्यानंतर एकाही भारतीयाला अशा प्रकारे नोबेल प्राप्त करता आले नाही. आमच्याकडे गुणवत्ता नक्की आहे. गरज आहे ती समन्वय साधून शिक्षणाला योग्य दिशा देण्याची. दयानंद शिक्षण संस्थेने गेली ५० वर्षे लातूरच्या शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले. आगामी काळात इतर शिक्षण संस्थांना दिशा देणारे काम या संस्थेच्या हातून घडावे.’’
‘लातूरला शिक्षणाची मोठी परंपरा आहे. विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर यांनी यासाठी मेहनत घेतली. गुणवत्तेच्या जोरावर लातूरला मराठवाडय़ाचे ऑक्सफर्ड म्हणून संबोधले जाते. लातूरची ही ओळख सार्थ आहे; असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले. महाराष्ट्राने शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती केली. प्राथमिक व माध्यमिक शाळांचे जाळे पसरले. राज्यपाल शंकरनारायणन यांच्या हस्ते प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी संपादित केलेल्या सुवर्ण स्मरणशिल्प या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील यांनी लातूरचा शैक्षणिक आढावा घेतला.