उत्तराखंडातील प्रलयापेक्षाही राज्यातील गारपीटग्रस्तांची समस्या भयंकर आहे. या प्रश्नावर राज्यासह केंद्रानेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे पत्रकार बैठकीत केले. गारपीटग्रस्तांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गारपीटग्रस्त भागाच्या पाहणीसाठी ठाकरे सोमवारी रात्री लातूर मुक्कामी आले होते. मंगळवारी सकाळी मसलगा, निटूर, लामजना, औसा भागाची पाहणी करून, ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या. त्यानंतर हॉटेल ग्रँड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. गारपिटीमुळे राज्याचे प्रचंड नुकसान झाले. शेतक-यांनी धीर धरला पाहिजे. त्यांनी हिंमत ठेवावी. राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांची हिंमत टिकून राहील, या साठी त्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे. आचारसंहितेच्या तांत्रिकतेत सरकारने अडकू नये. गारपीटग्रस्तांना कर्जमाफी, वीजबिल माफी, हे तातडीचे निर्णय घ्यावेत. त्यांना मदत किती रकमेची द्यायची, हा थोडा नंतरचा विषय आहे. प्राधान्याने करावयाच्या बाबी पूर्ण करून ठोस मदतीसंबंधी निर्णय घ्यावा. पंचनाम्याच्या जंजाळय़ात अडकू नये, असे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी गारपीटग्रस्तांच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. शरद पवार यांनीही गारपीटग्रस्त भागाचा दौरा केला. आता गरज तातडीची मदत करण्याची आहे. गारपीटग्रस्त भागात तब्बल १३ दिवसानंतर मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्र्यांना या संबंधी गांभीर्य नव्हते, असे आपल्याला वाटते का, या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे यांनी, त्यांना केवळ गारपीटग्रस्तांच्या प्रश्नांबाबतच गांभीर्य नाही असे नाही, तर इतर प्रश्नांबाबतही त्यांना गांभीर्य नाही. गारपिटीसारखी आपत्ती नसíगक आहे. त्यामुळे या प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी सर्वानी एकजुटीने काम केले पाहिजे. या बाबत कसलेही राजकारण केले जाऊ नये. मनसेचे नेते आमदार बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, प्रदेश सरचिटणीस अनिल शिदोरे, साईनाथ दुग्रे, अभय साळुंके, संतोष नागरगोजे आदी उपस्थित होते.