विरार :  एकीकडे करोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा पालिका कमी दाखवत आहे. तर दुसरीकडे मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा कमी पडत असल्याने स्मशानभूमी वाढवत आहे. पालिकेने जागा कमी पडत असल्याने ३ स्मशानभूमी वाढल्या आहेत. तर एक दफनभूमी वाढवत ८ गॅसदाहिन्या नव्याने बसवत असून उपलब्ध स्मशानात दोन ते तीन शेगडय़ा वाढविल्या आहेत.

वसई विरारमध्ये मागील महिन्यापासून करोना दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढताना दिसत आहे. दिवसागणिक करोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. सरासरी दिवसाला ७०० ते ८०० रुग्ण सापडत आहेत तर केवळ मागील एका महिन्यात १००३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सरासरी दिवसाला ३० ते ३५ जणांचे मृत्यू होत आहेत. तर २३ एप्रिल रोजी सर्वाधिक ७३ रुग्ण दगावले आहेत. यामुळे पालिकेने मृत्यू पावलेल्या रुग्णांवर तातडीने अंत्यसंस्कार करता यावे उपलब्ध स्मशानभूमीत जागा उपलब्ध होत नसल्याने पालिकेने ४ स्मशानभूमी वाढविल्या आहेत. यात नारंगी येथे ४ शेगडय़ा, रानपाडा बोळिंज, एन. एक्स. डोंगरपाडा येथे ४ शेगडय़ा तर रानापदा बोळिंज येथे ४ शेगडय़ा अशा पद्धतीने कोविड स्मशानभूमीत वाढ केली आहे.

आधी उपलब्ध असलेल्या स्मशानभूमीत पालिकेने नवघर माणिकपूर येथे आधी असलेल्या ६ शेगडय़ामध्ये वाढ करत अधिक २ शेगडय़ा वाढविल्या आहेत. आचोळे २ शेगडय़ा होत्या त्यात नव्याने ४ शेगडय़ा वाढविल्या आहेत. आणि गॅसदाहिनी सुरू केली आहे. समेळ पाडा २ शेगडय़ा, कोळीवाडा पाचूबंदर ४ शेगडय़ा होत्या अधिक ३ उपलब्ध केल्या आहेत. त्याचबरोबर पापडी येथे दफनभूमी तयार करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी १६ शेगडय़ा वाढविण्यात आल्या आहेत. तर पालिका ८ नव्या गॅसदाहिन्या वाढवत आहे. यातील पहिल्या टप्प्यात पाचूबंदर, विरार, समेळ आणि सातिवली येथील स्मशानभूमीत या दाहिन्या लावल्या जातील. तर दुसऱ्या टप्प्यात नवघर, नारंगी, फुलपाडा आणि डोंगरपाडा या परिसरात वाढविल्या जातील अशी माहिती बांधकाम अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली.