हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची सात दिवसांपासून मृत्यूशी सुरू असेलली झुंज अखेर आज अपयशी ठरली. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संतापाची भावना व्यक्त होताना दिसत आहे. गुन्हेगारास फासावर लटकवा, त्यालाही जिवंत जाळा, जशाच तशी शिक्षा द्या, केवळ दहा मिनिटांसाठी आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी संतप्त नागरिकांमधून होत आहे. राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. मारेकऱ्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी त्यांनी राज्यसरकारकडे केली आहे.

“हिंगणघाटमधील दुर्दैवी घटनेतील पीडितेला अखेर आपल्या प्राणाला मुकावे लागले. तिच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती मिळावी, यासाठी मी प्रार्थना करतो. ती आपल्यातून निघून गेली असली तरी तिच्या मारेकर्‍याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. पुन्हा कोणत्या युवतीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, अशी अद्दल त्याला घडली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारकडे आहे.” असं फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीला आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. यानंतर ऑरेंज सिटी रुग्णालायत आठवडाभरापासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर, आज सकाळी तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र शोककळा व्यक्त केली जात आहे. पीडितेच्या मृत्युनंतर तिच्या वडिलांना दुःख अनावर झालं आहे. “मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा. ज्या वेदना मुलीला झाल्या. त्याच वेदना आरोपीला झाल्या पाहिजे. निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांसारख नको, तर लवकरात लवकर न्याय हवा,” अशी संतप्त प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.