प्राणिमित्रांच्या प्रयत्नांना यश

सांगलीतील सिमेंटच्या जंगलात प्राणिमित्राकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले असून गेल्या एक वर्षांत चिमण्यांच्या संख्येमध्ये तब्बल चौपट वाढ झाली आहे. उद्याच्या (दि. २० मार्च) जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने नुकत्याच करण्यात आलेल्या  चिमण्यांच्या गणनेच्या आकडेवारीतून हे यश उलगडले  आहे.

सांगलीत गेल्या काही वर्षांपासून चिमण्यांच्या संख्येत खूप मोठय़ा प्रमाणात घट होत असल्याचे लक्षात येत होते. याची दखल घेत शहरातील काही निसर्ग पर्यावरण प्रेमी संस्था आणि कार्यकर्त्यांनी ही संख्या वाढवण्यासाठी गेल्या वर्षीपासून पद्धतशीर प्रयत्न सुरू केले आहेत. चिमण्यांच्या अधिवासाचे जतन करणे, पाण्याची व्यवस्था तयार करणे, कृत्रिम घरटी आदी प्रयोग गेले वर्षभर अवलंबले आहेत. या प्रयत्नांमुळे गेल्या वर्षी सांगलीत ३ हजार १७० संख्येने असलेल्या चिमण्या या वर्षी तब्बल १२ हजार ४०३ वर पोहोचल्या आहेत.

शहरातील ‘बर्डसाँग’ आणि ‘खोपा बर्ड हाउस’ या दोन संस्थांच्या वतीने शहरात नुकतीच चिमण्यांची ही मोजदाद करण्यात आली. यासाठी शहरातील कन्या पुरोहित प्रशाला, सांगली हायस्कूल, गर्ल्स इंग्लिश स्कूल, रजपूत सिटी इंग्लिश स्कूल, मालू हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, आरवाडे व दडगे हायस्कूल आदी १३ शाळेतील ४३५ मुलांनी आपल्या घराच्या आसपास आढळणाऱ्या चिमण्यांची नोंद केली. यासाठी प्रत्येकाकडे एक नमुना अर्ज देण्यात आला आहे. सकाळी ७ ते ९ या एकाच वेळेत शाळा, दुकाने, घरासमोरचे अंगण, गच्ची आदी परिसरात दिसलेल्या चिमण्यांची नोंद करण्याचे या मुलांना सांगण्यात आले आहे. या मोहिमेत पालकांचाही सहभाग घेण्यात आला. या साऱ्यांना ‘खोपा हाउस’चे सचिन शिंगारे, सुनीता शिंगारे, ‘बर्ड साँग’चे शरद आपटे, ‘अ‍ॅनिमल सहारा’चे अजित काशीद, निनाद गोसावी, तेजस्विनी पाटील, गणेश दातार, जगन्नाथ कवले आदींनी मार्गदर्शन केले.  या दोन्ही संस्था आणि स्वयंसेवकांनी या चिमण्यांच्या अधिवासाचे जतन करणे, पाण्याची व्यवस्था तयार करणे, कृत्रिम घरटय़ांचे प्रयोग आदी प्रयोग गेले वर्षभर अवलंबले आहेत. यात ‘खोपा हाउस’च्या शिंगारे दांपत्याने शहरात विविध

ठिकाणी कृत्रिम घरटी बसवली आहेत. या साऱ्यांमुळे चिमण्यांची संख्या वाढण्यास चांगलाच उपयोग झाल्याचे या पाहणीत आढळून आले आहे.