तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय महिला औद्योगिक को -ऑपरेटिव्ह सोसायटी ही राज्यातील महिलांद्वारे सौर पॅनल निर्मिती करणारी एकमेव को-ऑपरेटिव्ह सोसायटी ठरली आहे. महिलांद्वारे चालविल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या तांत्रिक उद्योगाला चालना देण्यासाठी आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्यांच्या उत्पादनाची ‘मेडा’अंतर्गत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून, त्यांना राज्यातील अपारंपारिक ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पात सहभागी करून घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहेत.
वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यातील कवठा झोपडी या गावातील मागासवर्गीय महिलांद्वारे सोलर पॅनल निर्मिती केली जाते. उमेदच्या महिला बचतगटांनी एकत्र येऊन २०१८ मध्ये को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आयआयटी मुंबईच्या माध्यमातून महिलांना तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देऊन या उद्योगाला जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी सुद्धा दिला होता. महिलांनी राजस्थानमधील डुंगरपूरच्या दुर्गा सोलर एनर्जी कंपनीमध्ये प्रशिक्षण घेतले. या उद्योगात २१४ महिलांचा समभाग असून यातील ४० महिला सोलर पॅनल निर्मिती करण्यात तरबेज झाल्या आहेत. तसेच इतर महिला पॅनलची उभारणी, मार्केटिंग आणि लेखा विभागाचे कामकाज सांभाळतात. या सर्व महिला तांत्रिकदृष्ट्या एखाद्या अभियंत्याप्रमाणे काम करतात.
सोलर पॅनल व पथदिव्यांची मेडा अंतर्गत नोंदणी न झाल्यामुळे या महिला उद्योजकांना मोठे प्रकल्प मिळत नाही, अशी बाब महिलांनी सांगितल्यावर पालकमंत्र्यानी त्यांच्या उत्पादनाची तात्काळ नोंदणी करण्याचे आदेश दिले. तसेच अपारंपारिक ऊर्जा निर्मिती अंतर्गत मोठ्या प्रकल्पामध्ये राज्यभरात या महिला उद्योजकाना प्राधान्य देण्याचेही त्यांनी सांगितले. महिलांद्वारे सोलर पॅनल तयार होणाऱ्या फॅक्टरीचे उद् घाटन मंत्री महोदयांनी करावे अशी विनंती महिलांनी केली असता, हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फॅक्टरीचा शुभारंभ करण्याची हमी त्यांनी महिलांना दिली.
यावेळी संगीता वानखेडे व महिलांनी पालकमंत्री केदार यांना उद्योगासंबंधी माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उमेदच्या जिल्हा समन्वयक स्वाती वानखेडे मेडाचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 10, 2020 11:56 am