रस्त्यावर गाड्या का लावल्या? हा जाब विचारल्याचा राग मनात धरून तुळजापूरचे पोलीस उप निरीक्षक गणेश झिंझुर्डे यांना युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करताच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमला होता.

तुळजापूर शहरातील मुख्य मार्गावर दुचाकी, चारचाकी गाड्या लावण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. तेथून जात असताना कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंझुर्डे यांनी आपली गाडी थांबवली व या गाड्या कोणाच्या आहेत? ज्याच्या असतील त्यांनी काढून रस्ता मोकळा करा नाहीतर कारवाई करीन अशी तंबी दिली होती. चार माणसात बोलल्याचा राग मनात धरून युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप रोचकरी आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंझुर्डे यांच्या छातीवर, हातावर तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करून त्यांना जखमी करण्यात आले. मारहाण करणाऱ्या प्रदीप रोचकरी आणि अन्य दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करताच, पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता.