राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असल्याने, सर्व पक्षांकडून विविध मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली जात आहे. तर पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. साम, दाम आदीसह सर्व बाबींचा वापर करून पक्षाकडून उमेदवारी मिळवता मिळवता दमछाक होणारे उमेदवार एकीकडे आपल्याला दिसत असताना, दुसरीकडे एकाच उमेदवाराला दोन राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

कोल्हापूरमधील करवीर मतदारसंघामधून डॉ. आनंद गुरव यांना आम आदमी पार्टी व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवारी जाहीर केल्या गेली आहे. शनिवारी आम आदमी पार्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ५० जागा लढवणार असल्याचे सांगत ८ उमेदवारांची घोषणा केलेली आहे. या आठ उमेदवारांच्या यादीत करवीर मतदारसंघामधून डॉ. आनंद गुरव यांना उमेदवार म्हणून घोषितही करण्यात आलेले आहे. मात्र, असे असूनही वंचित बहुजन आघाडीने आज (मंगळवार) जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतही करवीर मतदारसंघासाठी आनंद गुरव यांचेच नाव निश्चित केले आहे. त्यामुळे एकाच उमेदवारास दोन्ही पक्षांनी उमेदवारी घोषीत केल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे.

तर, वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन उमेदवारांची यादी घोषीत केल्यानंतर, आनंद गुरव यांनी आपण आम आदमी पार्टीमधील सर्व पदांचा राजीनामा दिला असल्याचे व आपली उमेदवारी मागे घेत असल्याचेही सांगितले आहे.

लोकसत्ता ऑनलाइनने आनंद गुरव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणार आहे. ‘आप’ ला मी माझी उमेदवारी मागे घेत असल्याचे कळवले आहे, ‘आप’कडून मी निवडणूक लढवणार नाही. मी कोल्हापूरमध्ये आम आदमी पक्षाचे याअगोदर काम करत होतो. मात्र, उस्मानाबादमध्ये गुरव समाजाच्या एका तरूणीवर झालेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आम्हाला मदत केल्यामुळे आता मी वंचित बहुजन आघाडीबरोबर असल्याचे त्यांनी सांगितले.