दहा वर्षांनंतर विवाह; समाजमाध्यमावर प्रसिद्ध पत्रिकेवरून विवाहाची चर्चा

आजवर ‘दोन बायका फजिती ऐका’ असे अनेकवेळा ऐकायला मिळते. मात्र ही म्हण पालघर जिल्ह्य़ातील तलासरी तालुक्यात खोडून काढण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून एका रिक्षाचालकाच्या सोबत दोन बायका सुखाने संसार करीत आहे.

विवाहासाठी अर्थिक परिस्थिती नसल्याने आजतागायत विवाहविना राहिलेले हे दाम्पत्य आज काहीशी आर्थिक परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यावर कायदेशीररीत्या २२ एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. याबाबतची पत्रिका समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाल्याने या विवाहविषयी उत्सुकता आणि चर्चा सुरू झाली आहे.

तलासरी तालुक्यतील वसा सुतारपाडा येथील आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या संजय धाडगा या आदिवासी तरुणाने रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह सुरू केला. १० वर्षांपूर्वी बेबी नावाच्या मुलीशी त्याचे सूत जुळले त्यानंतर हे दोघे एकत्र घरात राहून संसाराचा रहाटगाडा हाकू लागले. संसार सुरू असतानाच आठ वर्षांपूर्वी रीना नावाच्या मुलीवर त्याचे प्रेम जुळले अन् बेबीच्या सहमतीने रीना घरी आली.

नंतर बेबी आणि रीना या दोघी संजयबरोबर एकाच घरात राजीखुशी लग्न न करताच संसारात रममाण झाले. सध्या बेबीला एक मुलगा- एक मुलगी, तर रीनाला एक मुलगी आहे. तिन्ही मुले शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

खंत आणि आनंद

संजय याची कायदेशीररीत्या होणारी पहिली पत्नी म्हणजेच बेबी घरी राहून किरकोळ किराणा दुकान चालवते, तर रीना गुजरातमधील कंपनीमध्ये कामाला जाते. तर संजय रिक्षा चालवून या सुखी संसाराचा गाडा हाकत आहे. घरातील एकत्र नांदत असलेल्या बेबी आणि रीना घरकामही आनंदाने एकत्र मिळून करतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र परिस्थिती नसल्याने आजतागायत विवाह करता न आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र आज विवाह होत असल्याने आपल्याला आनंद होत असल्याचे दोघींनी सांगितले.