करोना वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन दोनदा पुढे ढकलण्यात आलं होतं. त्याची तारीख निश्चित झाली असून करोना संसर्गाबाबतच्या अटी आणि शर्तींसह ७ आणि ८ सप्टेंबर रोजी हे अधिवेशन पार पडणार आहे.
अधिवेशनासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीनुसार, सभागृहासह प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीत देखील शारीरिक अंतराचे नियम पाळून माजी सदस्यांची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिवेशनाअगोदर एक दिवस म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे.
प्रत्येक सदस्यांना करोनापासून सुरक्षेसाठी सुरक्षा किट देण्यात येणार आहे. यामध्ये मास्क, हँडग्लोव्ह्ज आणि सॅनिटायझरचा समावेश असेल. सदस्यांच्या स्वीय सचिवांना सभागृहात प्रवेश मिळणार नाही. मात्र, त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. सदस्यांच्या वाहनचालकांची देखील बसण्याची तसेच नाश्ता, चहापाण्याची स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.
इतर आजार असलेल्या सदस्यांना त्यांच्या पक्ष गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चर्चेदरम्यान अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयके घेण्यात येणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 5:44 pm