गुलाबजाम बनविण्यासाठी तयार केलेल्या साखरेच्या गरम पाकाच्या पातेल्यात पडून गंभीररित्या भाजलेल्या तीन वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी नाशिकमधील हिरावाडीतील साईनाथ रो-हाऊसमध्ये घडली. स्वरा प्रवीण शिरोडे असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे स्वराचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी खासगी रूग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी, हिरावाडीतील साईनाथ रो-हाउस येथे शिरोडे कुटुंबीय राहतात. त्यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. रविवारी सकाळी ऑर्डरसाठी लागणारे गुलाबजाम बनविण्यासाठी एका पातेल्यात साखरेचा पाक तयार करण्यात आला होता. यावेळी तीन वर्षांची स्वरा ही खेळण्याच्या नादात गरम पाकाच्या पातेल्यात पडल्याने गंभीररीत्या भाजली. स्वराला त्वरीत सुरूवातीला आडगाव शिवारातील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, त्यांनी दाखल करून घेतले नाही. त्यानंतर तिला आडगाव नाक्यावरील खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर दुपारच्या सुमारास उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या नातेवाइकांनी उपचारातील हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करून या रुग्णालयाची तोडफोड केली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.