औरंगाबाद शहरातल्या गारखेडा भागात असलेल्या दुर्गेशनगर भागात एका भाजी विक्रेत्याला ८ लाख ७५ हजारांचे वीज बिल आल्याने त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जगन्नाथ शेळके असे या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. ते १० बाय १० च्या खोली राहता होती. त्यांच्या घरी पंखा आणि दोन ट्युबलाईट इतकीच उपकरणे आहेत. शेळके हे त्यांची पत्नी आणि त्यांचा बारावीत शिकणारा मुलगा यांच्यासह या ठिकाणी राहात होते. त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. जगन्नाथ शेळके यांनी इतके बिल कसे काय आले याबाबत भाऊ विठ्ठल शेळके यांच्याकडे चिंता व्यक्त केली होती. शेळके यांच्या घराचे वीज बिल ज्यांनी काढले त्या कनिष्ठ सहाय्यक सुशील कोळी यांना महावितरणने निलंबित केले.

शेळके हे गारखेडा भागात भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांना महावितरणकडून ८ लाख ७५ हजारांचे वीज बिल पाठवण्यात आले. हे बिल पाहून जगन्नाथ शेळके चक्रावून गेले. तसेच एवढे मोठे वीज बिल आल्याने ते तणावाखाली आले. आज पहाटे ४.३० च्या सुमारास वीज बिल जास्त आल्याने आत्महत्या करतो आहे अशी चिठ्ठी लिहून ठेवत शेळके यांनी आपली जीवनयात्रा संपवली. शेळके यांच्या नातेवाईकांनी महावितरण विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

जगन्नाथ शेळके यांच्या घराचे वीज मीटर काही दिवसांपूर्वी बदलण्यात आले होते. जुन्या मीटरमधील शेवटचे रिडिंग नव्या मीटरमध्ये नोंद करताना चूक झाली. ज्यामुळे ३ हजार रुपयांऐवजी त्यांना ८ लाख ७५ हजारांचे बिल दिले गेले. याप्रकरणी सुशील कोळी यांना महावितरणने निलंबित केले आहे.