शहरासह जिल्ह्य़ात दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली असून २२ संशयितांकडून ५८ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी दिली.
जिल्ह्य़ात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. दुचाकी चोरीचे सत्र थांबत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. पोलीस प्रशासनाने दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्यासाठी शिरपूर तालुका व धुळे शहरात दोन शोध पथक तयार केले. त्यात धुळे शहरातील पथकाने आझादनगर, धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्य़ातील चोरीस गेलेल्या दुचाकी तसेच अमळनेर व मालेगाव येथील चोरीस गेलेल्या दुचाकीचे गुन्हे उघडकीस आणले. एकूण सहा जणांकडून १० दुचाकी जप्त करण्यात आल्या. तर, शिरपूर तालुक्यातील पथकाने १८ संशयितांकडून ४८ दुचाकी जप्त केल्या. या दुचाकी अडावद, भुसावळ, अमळनेर, चोपडा, यावल, सेंदवा, वरला, शहादा, सारंगखेडा, नवापूर तसेच शिरपूर शहर व तालुक्यातून चोरी केल्याची कबुली संशयितांनी दिली. शोध पथकाने दुचाकी चोरी प्रकरणी अटक केलेल्या संशयितांमध्ये नंदकिशोर सोनवणे (वारुड, ता. शिरपूर), दिलीप भिल (वाल्मिकनगर, शिरपूर), आविद शेख (मौलवीगंज, धुळे), नाविद अन्सारी खलील अहमद, महंमद ओसामा निहाल अन्सारी, आसिफ हनिफ शेख (धुळे) यांचा समावेश आहे.