सध्या मला काही मुख्यमंत्री होण्याची घाई नाही अशी प्रतिक्रिया देत जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. औरंगाबादमध्ये अकराव्या गुणीजन साहित्य संमेलनात राम शिंदे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला साहित्यिक फ.मु. शिंदे यांचीही हजेरी होती. गुणीजन संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर फ.मु. शिंदे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. त्याचप्रमाणे राम शिंदे लवकरच मुख्यमंत्री होवोत अशा शुभेच्छा त्यांना सूत्रसंचालकांनी दिल्या. मात्र राम शिंदे यांनी या चर्चेवर पडदा टाकला. मी मुख्यमंत्री झालो तर मला आमदार करा असे फ.मु. शिंदे म्हणतील त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची अजिबात घाई नाही अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली ज्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. तसेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार आपणच आहोत असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते. त्यानंतर काय झाले हे सर्वश्रुत आहेच. हाच अनुभव लक्षात घेऊन राम शिंदे यांनी अगदी सावध पण मिश्किल प्रतिक्रिया दिली.

भाजप सरकारच्या वाढत्या जाहिरातबाजीवर होणाऱ्या टीकेचा धागा पकडत राम शिंदे म्हटले, सरकार फक्त जाहिरातबाजी करण्यात पुढे आहे असे समजू नका. या सरकारने चांगली कामे केली आहेत. लवकरच महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल. जनतेला मूलभूत आणि पायाभूत सुविधा देण्याचे काम याच सरकारने केले आहे. धोंडीराम माने यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भानुदास चव्हाण स्मृती सभागृहात ११ वे गुणीजन साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला साहित्य क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली होती. तसेच मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.