गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नको असं म्हणणारेच पक्षात जास्त आहेत असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच खातेवाटपारुन कोणतीही नाराजी नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच येत्या उद्यापर्यंत खातेवाटप होईल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. ते अहमदनगर या ठिकाणी बोलत होते. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणीही नाराज नाही. आमच्याकडे गृहमंत्रीपद नको असेच म्हणाणारे जास्त आहेत. खातेवाटपासंदर्भातला निर्णय आठ दिवसांपूर्वीच झाला आहे. तरुणांना संधी देण्यात आली आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापर्यंत खातेवाटप जाहीर करतील असंही शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

मंत्रिमंडळ विस्तार ३० डिसेंबर रोजी झाला. त्यानंतर एक ते दोन दिवसात खातेवाटप होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. मात्र तीन दिवस झाले तरीही खातेवाटप झालेलं नाही. खातेवाटपाबाबत काँग्रेमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा आहे. दरम्यान कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीही नाराजी नसल्याचं जाहीर केलं. आजही महाविकास आघाडीची खाते वाटपासंदर्भात बैठक पार पडली. मात्र खातेवाटप आजही जाहीर झालेलं नाही.

गृहमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल अशी चर्चा आहे. अशात शरद पवार यांनी त्यांच्या स्वभावाला साजेशी गुगली टाकणारं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्रीपद नको असे म्हणणारेच जास्त आहेत असं पवार यांनी म्हटलं आहे. आता नेमकं काय घडणार? ते खातेवाटप झाल्यावरच स्पष्ट होईल.