|| नितीन बोंबाडे

वाढवण बंदराविरोधात असलेल्या ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना घेराव

डहाणू : वाढवण बंदराला  स्थानिकांचा प्रखर विरोध आहे, असे असतानाही गुरुवारी  जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना गुंगारा देत  पर्यायी मार्गाने सर्वेक्षण करण्याचा घाट त्यांच्या अंगलट आला. सर्वेक्षण करुन  परतणाऱ्या  अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनाच्या रोषाला सामोरे जावे लागले.  संतप्त रहिवाशांनी वाहन अडवून  समुद्रातून गोळा केलेले जैवशास्त्रीय नमुने, नकाशे व इतर कागदपत्र हिस्कावून घेतल्याने आल्या पावली अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले.

वाढवण बंदराच्या सर्वेक्षणासाठी बुधवार आणि गुरुवारी जेएनपिटीचे अधिकारी आणि अभ्यासक येणार असल्याची माहिती गावात पसरली होती. त्यामुळे बुधवारपासून वाढवण, वरोर येथील संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले होते. त्यामुळे त्यादिवशी अधिकारी फिरकले नाहीत. तणावाची परिस्थिती पाहता गुरुवारी  पोलिसांनी अनेक भागात नाकाबंदी केली होती. तर सर्वेक्षणासाठी विरोध करण्यासाठी वाढवण समुद्राकडे जाणाऱ्या तिघरेपाडा येथील  मुख्य रस्त्यावर सकाळपासून ग्रामस्थांनी ठिय्या मांडला होता.  शंखोदर येथे शेकडो नागरिकांनी आपले बस्तान मांडले होते.  दरम्यान वाढवण आणि वरोर दरम्यान घोडपडी येथील पर्यायी अधिकाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी ग्रामस्थांना गुंगारा देऊन त्या मार्गे पहाटे ६ च्या सुमारास समुद्रात  पोहोचले आणि तेथील जीवशास्त्रीय नमुने गोळा करुन पोलीस बंदोबस्तात  ते परतत असताना ग्रामस्थांनी त्यांना पाहिले. एकंदरीत या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी सर्वे अधिकार्यांच्या वाहनाला घेराव घातला.  संतप्त जमावाने सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकार्यांचे वाहन अडवून  तपासले असता वाहनातून वाढवण समुद्रातून गोळा केलेले खडकाचे नमुने, वाळू, पाणी तसेच इतर साहित्याचे नमुने आढळून आले. ते त्यांनी हिसकावून घेतले. करोना काळात  स्थानिकांच्या परवानगीविना गावात आलेल्या  अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी  धारेवर धरले. एकच जिद्द वाढवण बंदर रद्दच्या घोषणा देत नागरिकांनी बंदराविरुद्ध संतप्त भावना व्यक्त केल्या. मोठ्या मुश्किलीने पोलिसांनी अधिकाऱ्यांना सुखरुप बाहेर काढले.  वाढवण बंदर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वाणगाव पोलिसात जाऊन  विनापरवानगी सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली.

पर्यायी मार्गाचा प्रयत्नही निष्फळ

वाढवन विरोधी ग्रामस्थांच्या तीव्र प्रतिक्रिया पाहून बुधवारी सर्वेक्षणाचे बेत रद्द करण्या आला. गुरुवारी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. तर ग्रामस्थांनी समुद्राकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडला होता. तरी जेएनपीटीचे अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना गुंगारा देऊन घोडपडी येथील पर्यायी मार्गाचा वापर करुन सर्वेक्षण केले. त्याचा सुगावा लागताच ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून सर्वेक्षणाचे सर्व साहित्य जप्त केले.