उस्मानाबाद-लातूर-बीडच्या विधानपरिषद मतदारसंघाची उद्या (२४ मे) होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली. मात्र, ती कधी घेण्यात येईल याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, या निवडणुकीबाबत एक वाद निर्माण झाला असून याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यामुळे उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

उस्‍मानाबाद-लातूर-बीड येथील स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघांची अर्थात विधानपरिषद मतदारसंघासाठी २१ मे रोजी मतदान झाले होते. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे २४ मे रोजी मतमोजणी तहसिल कार्यालय उस्‍मानाबाद येथे होणार होती. मात्र, निवडणुकीतील वादाचे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचल्याने मुख्‍य निवडणूक अधिकाऱ्यांनी एका परिपत्रकाद्वारे मतमोजणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील तारीख आयोगामार्फत लवकरच कळविण्‍यात येईल असे म्हटले आहे.

या मतदारसंघासाठी रमेश कराड यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीकडून या जागेसाठी अर्ज केला होता. मात्र, अचानक आठवड्याभरात त्यांनी अर्ज मागे घेत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या जगदाळेंना आपली उमेदवारी दिली. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री सुरेश धस यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यामुळे या निवडणुकीबाबत मोठी चर्चा आहे. तसेच या निवडणुकीत सुमारे ९९.९० टक्के मतदान झाल्याने ही निवडणूक चुरशीची झाली होती.