विमानाने प्रवास करणारा, अहमदाबादमध्ये फ्लॅट खरेदी करणारा, उंची हॉटेलमध्ये ऐषारामी जीवन जगणारा अट्टल चोरटा राजू प्रकाश नागरगोजे उर्फ राजवीर सुभाष देसाई (वय- २७,रा. उचगाव, ता. करवीर) याला जुना राजवाडा पोलिसांनी आज अटक केली आहे. त्याच्याकडून जिल्ह्यातील ३३ घरफ़ोडय़ा उघडकीस आल्या असून एकूण ३१ लाख २७ हजार ७३७ रुपये किमतीचे अडीच किलो सोन्या-चांदीचे दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.
राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते आणि इंद्रजीत सोनकांबळे यांना अट्टल गुन्हेगार देसाई हा बस स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे बस स्थानक परिसरात पोलिसांनी सापळा रचला. परीख पुलाकडे जात असताना नागरगोजे पोलिसांच्या सापळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला अटक करून १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी केलेल्या तपासात जुना राजवाडा,शाहपुरी, राजारामपुरी, इचलकरंजी, शिवाजीनगर,जयसिंगपूर,गांधीनगर पोलिस ठाण्याकडील एकूण ३३ गुन्हे उघडकीस आले असून चोरीस गेलेला सोन्या-चांदीचा एकूण ३१ लाख २७ हजार ७३७ रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला. या आरोपीने सन २०१० पासून वेगवेगळ्या ठिकाणी घरफ़ोडीचे गुन्हे केले आहेत. त्याने केलेल्या घरफ़ोडय़ांपैकी गांधीनगर येथील पाच घरफ़ोडी गुन्ह्यात तो फ़रारी होता, गांधीनगर पोलिस ठाण्याकडील १५ लाख रुपयाच्या खंडणीसाठी लहान मुलाचे अपहरण केल्याबाबतच्या गुन्ह्यातही तो फ़रारी होता.
राजू नागरगोजे हा कोल्हापुरात घरफ़ोडय़ा केल्या की पुण्याला बसने किंवा लक्झरीने प्रवास करत असे. पुण्यातून मुंबई, अहमदाबाद येथे विमानाने प्रवास करत असे. चोरीच्या पैशातून त्याने गुजरातमधील अहमदाबाद येथे फ्लॅट खरेदी केला असून तो तेथेच वास्तव्य करत होता. तो उंची हॉटेलमध्ये राहायचा असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.