13 December 2017

News Flash

तिसरी आघाडीच सत्तेवर येणार – शमीम फैजी

भ्रष्ट काँग्रेस व भांडवलदारांच्या जीवावर निवडणूक लढविणाऱ्या जातीय भाजपला सत्तेपासून येण्यापासून अडविण्यासाठी भाकप निवडणूक

वार्ताहर, परभणी | Updated: April 6, 2014 1:30 AM

भ्रष्ट काँग्रेस व भांडवलदारांच्या जीवावर निवडणूक लढविणाऱ्या जातीय भाजपला सत्तेपासून येण्यापासून अडविण्यासाठी भाकप निवडणूक लढवत आहे. केंद्रात सत्तेवर येणारे सरकार ना भाजपचे ना काँग्रेसचे, ते तिसऱ्या आघाडीचे असेल, असा दावा भाकप केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शमीम फैजी यांनी शनिवारी येथे केला.
भाकप उमेदवार राजन क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ फैजी येथे आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशभरात डाव्या आघाडीचे १६० उमेदवार उभे असून, त्यात भाकपच्या ७२ उमेदवारांचा समावेश आहे. भ्रष्ट काँग्रेस आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचणे व भाजपप्रणीत जातीय विचारसरणीच्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे, या प्रमुख उद्देशाने डावे पक्ष निवडणूक लढवत आहेत, असे फैजी यांनी स्पष्ट केले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे भांडवलदारांचे प्रतिनिधी आहेत. भाजपला निवडणूक लढविण्यासाठी उद्योगक्षेत्राचा पसा मिळाला आहे. मोदींनी गुजरातच्या शेतकऱ्यांची जमीन कवडीमोल दराने उद्योगपतींच्या घशात घातली. गुजरात मॉडेल म्हणजे देशातील साधनसंपत्ती व कामगारांचे श्रम अल्प किमतीत लुटण्याचा परवाना असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रात काँग्रेस आघाडी व शिवसेना-भाजपने जाती धर्माचा खेळ करीत मराठवाडय़ातील विकासाचे प्रश्न, कष्टकरी जनतेचे प्रश्न पुढे येणार नाहीत याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली. या सापळ्यातून मुक्त होण्यासाठी जनतेने परिवर्तन करावे, असे आवाहनही फैजी यांनी केले. पक्षाचे राज्य सचिव कॉ. भालचंद्र कांगो, उमेदवार कॉ. क्षीरसागर, अॅड. माधुरी क्षीरसागर, हेमाताई रसाळ आदी उपस्थित होते.

First Published on April 6, 2014 1:30 am

Web Title: third front come on power shamim faizi