मारेकरी सख्ख्या भावंडांना अटक

औरंगाबाद शहरात डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीनिमित्त क्रांतीचौकात उभारण्यात आलेल्या व्यासपीठाशेजारी शनिवारी रात्री एका तरुणाच्या पोटात गुप्ती भोसकून दोन भावंडांनी त्याचा खून केला. तिसऱ्याशी असलेल्या पूर्व वैमनस्यातून आशिष संजय साळवे याचा नाहक बळी गेला. या घटनेनंतर रविवारी सकाळपासून रमानगरातील नागरिकांसह कुटुंबीयांनी आरोपींच्या अटेकसाठी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर व पोलीस निरीक्षक परोपकारी यांनी सायंकाळपर्यंत मारेकऱ्यांना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर घाटीत मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. सायंकाळी सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात व त्यांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी असलेल्या दोन्ही भावंडांना कचनेर व बदनापुरातून अटक केली.

मृत आशिष संजय साळवे (२५, रा. गल्ली क्र. २, रमानगर) हा सिडकोतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयात कंत्राटी नोकरीवर होता. त्याचा भाऊ सचिन हा अजय मुथा यांच्याकडे नवकार केटिरगमधे कामाला आहे. दुसरा भाऊ शुभम हा पगारिया ऑटो येथे नोकरीला आहे. आशिषचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले असून त्याची पत्नी गर्भवती आहे. आशिष हा रवी व राहुल जाधव यांचा मित्र होता. जाधव बंधूंचे व अविनाश गौतम जाधव आणि कुणाल गौतम जाधव (दोघेही रा. रमानगर) यांच्यात मागील पंधरा वर्षांपासून वाद आहे. कौटुंबिक कारणावरून असलेला हा वाद मागील काही दिवसांपर्यंत ठाण्यापर्यंत पोहोचला नव्हता. मागील काही दिवसांपूर्वी घरात बोकड शिरल्याच्या कारणावरून जाधव कुटुंबीयांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून जाधव कुटुंबीयांमधील वाद वाढला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रमानगरातील राहुल हरिश्चंद्र जाधव यांना व्यासपीठ उभारायचे होते. सकाळी सात वाजेपासून मृत आशिष, रहिम पठाण, राहुल कीर्तीकर, सूरज निकाळजे असे कामाला मदत करत होते. दुपारी दोनच्या सुमारास आशिष जेवणासाठी घरी गेला. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा क्रांतीचौकातील व्यासपीठाच्या ठिकाणी गेला. रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास अविनाश आणि कुणाल हे दोघेही भावंडे व्यासपीठाजवळ आले. त्यांनी आशिषला व्यासपीठाच्या बाजूला घेत त्याच्या पोटात गुप्ती भोसकली. यानंतर दोघांनी तेथून पळ काढला. आशिष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे सूरज निकाळजेने पाहिले. मिरवणुकीची गर्दी असल्याने काहीवेळ त्याला कोणाला प्रकार सांगावा म्हणत तो गोंधळून गेला. याच वेळी त्याने तेथून जात असलेल्या आशिषचा धाकटा भाऊ सचिन याला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आशिषला उस्मानपुरा भागातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी आशिषला तात्काळ घाटीत दाखल करण्याची सूचना केली. त्यामुळे त्याला रुग्णवाहिकेने घाटीत हलविण्यात आले. पण घाटीत नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान महिनाभरात औरंगाबादेत संकेत कुलकर्णी, अजय तिडके व आता आशिष साळवे या तीन तरुणांचे खून करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.

बदनापूर, कचनेरमध्ये आरोपींना पकडले

आरोपी अविनाश गौतम जाधव आणि कुणाल गौतम जाधव (दोघेही रा. रमानगर) यांना रविवारी सायंकाळी अटक करण्यात आली. अविनाश जाधव याला कचनेरमधून तर कुणाल याला जालना जिल्ह्य़ातील बदनापूर येथून अटक केल्याचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले. या कारवाईत थोरात हे स्वत व गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे, आय. व्ही. कांबळे, हंबर्डे, राठोड, सोनवणे व नंदू चव्हाण आदींचा सहभाग होता.

अवघ्या साडेतीनशे रुपयांसाठी भोसकले

मोबाइलच्या व्यवहारातून बाकी राहिलेल्या ३५० रुपयांसाठी झालेल्या वादातून तीन तरुणांनी मिळून एकाला भोसकले. १४ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली असून जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुलेमान शेख (वय २०) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो हुसेन कॉलनी येथील रहिवासी आहे. त्याचा व मयूर सुरेश जावळे याचा मोबाइल खरेदी-विक्रीतून व्यवहार झाला होता. सुलेमानकडून मयूर याने मोबाइल खरेदी केला होता. त्याची काही रक्कम देणे बाकी होते. त्यावरून मयूर व सुलेमान यांच्यात पुंडलिकनगरात वाद झाला. त्यातून मयूर जावळे व ऋषीकेश मोहन गोसावी, प्रवीण अरुण यांनी मिळून सुलेमान याला भोसकले. मयूर हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून ऋषीकेश व प्रवीण हे दोघे बीएसस्सी संगणक विज्ञानचे विद्यार्थी आहेत. या तिघांनाही रविवारी गुन्हे शाखेने अटक केली. या आरोपींना सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या पथकाने अटक केली.