सुनील तटकरे यांचे प्रतिपादन

या वेळी लोकसभा निवडणुकीत निष्क्रियतेविरुद्ध सक्रियतेची लढाई आहे. गेल्या ३० वर्षांचा निष्क्रीय कारभार आणि विकासाभिमुख कार्यक्रम समोर ठेऊन संजय कदम यांच्यासारख्या विकासाला झोकून देणारा आमदाराना सोबत घेऊन या भागामध्ये काम करण्याची आमची मानसिकता आम्हाला दाखवून द्यायची आहे. तुमचा विकास करण्याची सर्वस्वी माझी जबाबदारी राहील, असे आश्वासन रायगड-रत्नागिरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दिले.

हण्र येथे आयोजित केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत ते म्हणाले की, ऐतिहासिक स्वरूपाच्या लोकसभेच्या निवडणुकीला सर्व देश सामोरा जात आहे. आपण सर्व कार्यकत्रे या भागामध्ये वेगवेगळ्या माध्यमामधून येथील जनतेची सेवा करत आहात.मलासुद्धा १९९९ मध्ये आघाडी सरकारच्या काळात या जिल्ह्यात पालकमंत्रीपद मिळाले होते. त्यावेळी समुद्र किनारी वसलेल्या या परिसराला चांगली विकासवृद्धी मिळावी यासाठी अनेक कामे या भागामध्ये केली आहेत. राज्यात आत्तापर्यंत ऊस उत्पादकाला, शेतकऱ्याला मदत मिळाली. पण मच्छिमारांना कधी पॅकेज दिले नव्हते. पण २००३ मध्ये माझ्याकडे मच्छिमार विकास खाते असताना स्वतंत्र पॅकेज कोकणाला दिल गेले.

मच्छिमार समाज प्रचंड कष्टकरी आहे. त्यांना उत्पन्नाचं साधन मिळण्यासाठी निव्वळ मदत म्हणून विकास करायचा नसून राष्ट्रालादेखील भरघोस चलन मिळवून देणारा हा मत्स्यव्यवसाय आहे. तेव्हा या व्यवसायाच्या दृष्टीने त्या भागाचा विकास करणे हे त्या लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे काम आहे. अलीकडे या भागामध्ये एलईडी दिव्यांच्या प्रकाशात मासेमारीचा ज्वलंत प्रश्न येथील पारंपरिक मच्छीमारांना भेडसावत आहे. या विषयामध्ये लोकप्रतिनिधींनी ठामपणे पाठीशी उभे राहणे गरजेचे असते. त्या प्रमाणे या भागातील लोकप्रिय आमदार संजय कदम कायम या मच्छीमारांच्या पाठीशी उभे आहेत. या भागातील महत्वाचे बंदर म्हणून गणले जाणा-या हण्र बंदराचा जेटीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे. अत्याधुनिक बंदर झाले तर या भागाला प्रचंड फायदा होईल. सहावेळा खासदारकीची निवडणूक लढवून लोकांनी खासदार म्हणून निवडून देऊनसुद्धा या बंदराकडे सध्याच्या खासदारांनी दुर्लक्ष केले आहे. मला फक्त एकदाच संधी देऊन खासदार म्हणून निवडून दिले तर केंद्र शासनाकडून लागणारा निधी आणून हे हण्र बंदर अत्याधुनिक बंदर म्हणून उभं करण्याची जबाबदारी माझी राहील, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. तसेच या भागातील सर्व संस्थांचे फेडरेशन करून शीतगृह कारखानदारी तसेच मोठे मस्त्योत्पादन कारखानदारी उभी केली तर या भागाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही.

आपल्याकडे अर्थमंत्री पद असताना कोकणातील मच्छीमारांना डिझेल परतावा आपण दिला, याचे स्मरण करून देऊन तटकरे म्हणाले की, ३० वर्षे खासदारकी केलेल्या लोकप्रतिनिधींनी मात्र या भागाच्या विकासाकडे या भागातील मतदारांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले आहे. म्हणूनच कोकणतील अशा बंदरांचा विकास अजूनही बाकी राहिला आहे. आता अशा लोकप्रतिनिधींना कसे निवडून द्यायचे याचा विचार करण्याची वेळ तुम्हा मतदारांवर आली आहे. या परिसरात पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी केंद्रातून निधी आणून श्रीवर्धनच्या धर्तीवर पर्यटन विकासाचाही मनोदय तटकरे यांनी व्यक्त केला.