नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बुधवारी एकाच दिवसात विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या तीन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात इतर भागांपेक्षा सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मालेगावमध्येच आढळून आले आहेत.

मालेगावातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका करोनाबाधित तर दोन करोनासंशयित अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांत अकरा नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने मालेगावातील करोनाबाधितांची संख्या आता ९६ वर पोहोचली आहे. यांपैकी १० करोनाबाधितांचा पहिला करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच आत्तापर्यंत करोनामुळं नऊजण दगावले असून अन्य तीन करोना संशयित मृतांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ३२ वर्षीय रुग्णाचा सकाळी मृत्यू झाला. करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच जीवन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेला एक ४५ वर्षीय करोनाबाधित पुरुष व ४९ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.