येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून त्यांच्या संपर्कातील रुग्णांसह कर्मचाऱ्यांनाही अलगीकरण करण्यात आले आहे.

रविवारी दिवसभरात नव्याने १४ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर दोन जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी एक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी आहे. दुसरीकडे, दिवसभरात २३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

शनिवारी सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्य़ात १४ नवीन रुग्ण वाढल्याने मार्च महिन्यापासून एकूण रुग्णांची संख्या ७१० झाली आहे. त्यापैकी एकूण ४८४ जण पूर्णपणे तंदुरुस्त होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यत विविध रुग्णालयांमध्ये मिळून २०७ रुग्णांवर उपचार चालू आहेत.

रत्नागिरी तालुक्यात नव्याने सापडलेल्या पाच रुग्णांपैकी तिघेजण जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आहेत. ते निवखोल, नाचणे गोडावून आणि एक चर्चरोड येथे राहतात. या तिघा रुग्णांच्या संपर्कात जिल्हा रुग्णालयातील अनेकजण आले असल्यामुळे त्याचा रुग्णालय व्यवस्थापनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या वॉर्डमधील रुग्णांसह कर्मचाऱ्यांनाहीअलगीकरण करून ठेवले आहे.  दरम्यान दापोली तालुक्यातील दाभोळ आणि आंजर्ले या दोन ठिकाणी करोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. त्यापैकी एकजण आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य सहाय्यक होता.  काही दिवसांपूर्वी त्यांना तापसदृश रोगाची लागण झाली होती. तसेच रक्तातील पांढऱ्या पेशी झपाटय़ाने कमी झाल्या होत्या. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात ३० जून रोजी दाखल केले असता त्यांचा करोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला होता. त्यावर उपचार चालू असताना रविवारी त्यांचा मृत्यू ओढवला.  दाभोळ येथील रुग्णाचे वय ६० वर्षे असून त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तसेच एकदा हृदयविकारचा झटका येऊन गेला होता. रुग्णालयात दाखल  होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पण तपासणीसाठी पाठवलेल्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २७ झाली आहे.

पोलिस दलातील वरिष्ठ करोनाबाधित अधिकाऱ्याच्या संपर्कातील ३८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कारागृह पोलीस आणि जिल्ह्यच्या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यालयातील पोलीस अधिकारी आणि कर्ममचाऱ्यांचा त्यात समावेश आहे.