घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली येथे (जि. जालना) कपडे धुण्यासाठी तलावात गेलेल्या सहा मुलींपैकी तीन मुलींचा बुडून दुर्देवी अंत झाला. ही घटना आज (दि.२० मे) सकाळी अकाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोमित्रा सातपुते (वय १२), संगीता रणमळे (वय १५) आणि जना रणमळे (वय १८) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत.

घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली येथे लघुसिंचन तलावावर या १५ ते १७ वयोगटातील सहाही मुली कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणी धुतल्यानंतर या मुलींनी तलावात पोहायला सुरुवात केली. तलावात खदानी असल्याने त्यातील गाळात त्या फसल्या. त्यामुळे त्यांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आक्रोश ऐकून काही मुलांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यातील तीन मुलींना वाचवण्यात त्यांना यश आले. मात्र सोमित्रा सातपुते, संगीता रणमाळे आणि जनाबाई रणमाळे यांना वाचवता आले नाही. कल्याणी खोसे, मनीषा रणमाळे आणि ज्योती हेमके ही वाचलेल्या मुलींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.