तालुक्यातील प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्यातील मळीच्या टाकीचा स्फोट होऊन तीन जण जागीच ठार व १५ कर्मचारी जखमी झाले. टाकीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना बुधवारी सकाळी हा स्फोट झाला.
या स्फोटात कारखान्याचे उपमुख्य केमिस्ट विनोद दादा जोंधळे (वय ६०, राहणार निमगावजाळी, ता. राहाता), पंपमन शशिकांत भिकाजी (५२, राहणार लोणी बुद्रुक) व वेल्डर बाळू संपत देवरे (५६, राहणार प्रवरानगर) अशा तिघांचा मृत्यू झाला. या टाकीची दुरुस्ती सुरू होती. त्याची पाहणी करण्यासाठी तिघे गेले होते. त्याच वेळी हा स्फोट झाला. १५ जण जखमी झाले. त्यातील दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखालील हा कारखाना आहे. कारखान्याच्या आवारातील चार हजार लिटर टन क्षमतेच्या मळीच्या टाकीला गळती झाली होती. ते लक्षात आल्यानंतर बुधवारी सकाळी कारखान्याचे काही अधिकारी व कर्मचारी टाकीची दुरुस्ती करण्यासाठी गेले. टाकीची दुरुस्ती सुरू असतानाच टाकीचा अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर या टाकीतील मळी सर्वत्र पसरली. ती अंगावर पडल्यानेही कामगार जखमी झाले. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी जखमींना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2016 रोजी प्रकाशित
विखे-पाटील साखर कारखान्यात स्फोट; तीन ठार
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखालील हा कारखाना आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 07-04-2016 at 00:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three killed in radhakrishna vikhe patil sugar factory blast