लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेसच्या जिल्हय़ातील तिन्ही मंत्र्यांचे अस्तित्व टांगणीला लागले आहे. या पारंपरिक बालेकिल्ल्याला पडलेले खिंडार बुजवण्याची जबाबदारी प्राधान्याने त्यांच्यावरच टाकण्यात आली असून, त्यामुळेच मनोमिलनाच्या प्रक्रियेला जिल्हय़ात गती मिळाली आहे. सोमवारी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची झालेली बैठक हा त्याचाच भाग असल्याचे समजते. त्याचेच पडसाद या बैठकीत उमटल्याचे समजते.
लोकसभेची निवडणूक कधी नव्हे तो, दोन्ही काँग्रेसने कमालीच्या गांभीर्याने घेतली आहे. त्याची जबाबदारी मुख्यत्वे जिल्हय़ातील तीन मंत्र्यांवरच टाकण्यात आली असून दोन्ही काँग्रेसची ही संयुक्त व्यूहरचना आहे. त्यामुळेच सोमवारी नगरला घाईतच दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावून जिल्हय़ातील दोन्ही जागांचे आव्हान संघटितपणे पेलण्याच्या आणाभाका घेण्यात आल्या. या मनोमिलनाने दोन्ही काँग्रेसच्या गोटात वरकरणी समाधान दिसत असले तरी दुस-या व तिस-या फळीतील कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाविषयी साशंकताच व्यक्त होते. शिवाय आमदार बबनराव पाचपुते, आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार प्रसाद तनपुरे यांची अनुपस्थिती खटकलीच. दोन्ही काँग्रेसचे नगर शहरातील नेतेही बैठकीला अनुपस्थित होते.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी सोमवारी दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीच्या निमित्ताने हे प्रमुख नेते प्रदीर्घ काळानंतर एकत्र आल्याचे चित्र दिसले. तरी चेह-यावरील अस्वस्थता त्यांना लपवता आली नाही. मधुकर पिचड, बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या तीन मंत्र्यांसह जिल्हय़ातील दोन्ही उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे व राजीव राजळे, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, शंकरराव कोल्हे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, शिवाजीराव नागवडे, नंदकुमार झावरे, आमदार शंकरराव गडाख, दोन्ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व घनश्याम शेलार, माजी खासदार दादा पाटील शेळके आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. मात्र अनुपस्थितांचीच चर्चा अधिक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेच्या दोन्ही जागाजिंकण्याच्या दृष्टीने मुख्यत्वे दोन्ही काँग्रेसची जिल्हय़ातील गटबाजी संपवण्याची तंबीच दोन्ही काँग्रेसच्या श्रेष्ठींनी दिल्याचे समजते. त्याचीच जबाबदारी तिन्ही मंत्र्यांवर टाकण्यात आली आहे. पक्षीय पातळीवरील स्पर्धा आणि अंतर्गत वाद याचा फटका पुन्हा बसला तर त्याचा पहिला जाब तिन्ही मंत्र्यांनाच द्यावा लागेल, ही बाब आता स्पष्ट झाली असून एका ज्येष्ठ नेत्यानेच त्याला दुजोरा दिला. यदाकदाचित कुठल्या जागेवर अपयश आले तर मंत्रिपदावरही गंडांतर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यादृष्टीनेच श्रेष्ठींचे एकूणच निवडणूक हालचालींकडे बारकाईने लक्ष आहे. त्याची जाणीव दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी तिन्ही मंत्र्यांनाही दिल्याचे समजते. त्यामुळेच जिल्हय़ात मनोमिलनाची भाषा सुरू झाली.
जिल्हय़ात राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांत औपचारिकता पाळावी एवढेच सख्य आहे. जिल्हा परिषद व अन्य संस्थांमधील सत्तावाटणीवरून वादच अधिक आहेत. शिवाय दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत गटबाजीही आहे. विशेषत: काँग्रेसमध्ये विखे-थोरात अशी सरळ दुफळी आहे. परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी या सगळय़ा गदरोळात कोणीही सोडत नाही. याच सगळय़ा गोष्टींची जबाबदारी आता थेट या तीन मंत्र्यांवरच टाकण्यात आल्याने एकूणच या निवडणुकांना कमालीचे गांभीर्य प्राप्त झाले आहे. जिल्हय़ातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील गेल्या वेळचा अनुभव पाठीशी ठेवून ही मोर्चेबांधणी करण्यात आल्याचे समजते.
पत्रकारांशी बोलताना सर्वच नेत्यांनी या मनोमिलनावर शिक्कामोर्तब केले, एवढेच नव्हेतर संयुक्त प्रचार मोहिमेचीही घोषणा या वेळी करण्यात आली. वाकचौरे आणि राजळे या दोघांचा उमेदवारी अर्ज आणि प्रचाराचा शुभारंभही नगरलाच संयुक्तपणे होणार असून, खासदार सुप्रिया सुळे त्यासाठी जातीने उपस्थित राहणार आहेत. परवा (गुरुवार) हे दोन्ही उमेदवार त्यांचा अर्ज दाखल करतील.