शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर चापडगाव येथे कांबी फाटय़ावर सकाळी व्यायामासाठी गेलेल्या महिलांना भरधाव वेगाने जाणा-या अज्ञात वाहनाने चिरडले. या अपघातात तिन्ही महिला जागीच ठार झाल्या. अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. त्याने चापडगाव येथे शोककळा पसरली आहे.
या अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. रुक्मिणी लक्ष्मण दारुणकर (वय ६४), गयाबाई सीताराम दातीर (वय ५५), जनाबाई रंगनाथ मिसाळ (वय ६०, सर्व रा. चापडगाव). याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की चापडगाव येथील अनेक महिला दररोज सकाळी पहाटे व्यायामासाठी जातात. नेहमीप्रमाणे बुधवारी या महिला शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरून पायी जात असताना कांबी फाटय़ानजीक रस्त्याने भरधाव वेगाने जाणा-या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या महिला या वाहनाखालीच चिरडल्या गेल्या. तीन महिला जागीच ठार झाल्या, तर पुष्पा नंदू बाहेती, रशिदा निजाम पठाण, प्रमिला बबनराव जोशी, विमल निळू पातकळ (सर्व रा. चापडगाव) या अपघातात जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर वाहनचालक लगेचच पसार झाला. या अपघाताच्या आवाजाने जवळच्या वस्तीवरील लोक धावले, मात्र तोपर्यंत वाहनचालक लांबपर्यंत गेला होता. या लोकांनीच जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले.
या घटनेमुळे चापडगाव परिसरात शोककळा पसरली आहे. परिसरातील व्यापा-यांनी दुपापर्यंत बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून या मृतांना श्रद्धांजली वाहिली. दुपारी शोकाकुल वातावरणात तिन्ही मृत महिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भारत लोहकरे, बाळासाहेब मुंदडा यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दुपारी केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी या कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजित लकडे, उपनिरीक्षक राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.