बीडमधील सात वर्षांपूर्वीचे गर्भपात प्रकरण

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ. शिवाजी सानप यास न्यायालयाने गुरुवारी तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सात वर्षांपूर्वीच्या अर्भक मृत्यू प्रकरणात गर्भपात प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी दुसरे जिल्हा न्या. ए. एस. गांधी यांनी हा निकाल दिला. या काळात बीड जिल्हय़ाचा मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर कमालीचे बिघडलेले होते.

शहरातील बिदुसरा नदीच्या पात्रात २०११ मध्ये काही अर्भके मृतावस्थेत आढळून आली होती. गर्भात स्त्रीलिंगी अर्भक असेल तर ते काढून टाकण्यासाठी काही दवाखाने प्रसिद्ध होते. डॉ. सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांच्या रुग्णालयातील असे प्रकार उघडकीस आल्यानंतर काही अर्भके बिंदुसरा नदीच्या पात्रात आढळून आली. या प्रकरणाचा तपास केला जावा, अशा मागण्या विविध सामाजिक संघटनांनी केल्या होत्या. पोलिसांनी त्यानंतर केलेल्या तपासात  डॉ. शिवाजी सानप यांच्या रुग्णालयातून गर्भपात झालेली अर्भके नदीपात्रात आल्याचे स्पष्ट आले. डॉ. शिवाजी सानप यांच्यासह रुग्णालयातील इतर कर्मचारी आणि सहकारी डॉक्टरांवर प्रसूतपूर्व गर्भिलग निदान प्रतिबंधक कायदा, गर्भपात प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करून तत्कालीन पोलीस निरीक्षक विद्यानंद काळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी दुसरे जिल्हा न्यायाधीश ए. एस. गांधी यांच्यासमोर झाली.